ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Tuljapur News: भक्तीच्या दरबारातही आता भेदभावाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत की काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. ज्या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक अनवाणी पायाने तुळजापुरात येतात, त्याच देवीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सध्या एका मोठ्या वादाचे सावट पसरले आहे. हे प्रवेशद्वार सर्वांसाठी खुले असावे की ठराविक लोकांसाठी, यावरून सध्या तुळजापूरमध्ये रणकंदन माजले असून प्रशासनाच्या एका निर्णयाने स्थानिक व्यापारी आणि भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
काय आहे प्रकरण?
आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील राजे शहाजीराजे महाद्वार हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. मात्र, सध्या हे प्रवेशद्वार केवळ व्हीआयपी पासधारक आणि सिंहासन पूजा करणाऱ्या भाविकांसाठीच मर्यादित ठेवण्यात आले असल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे.
एखादा सामान्य भाविक दर्शनासाठी येतो, तेव्हा त्याला या मुख्य द्वारातून प्रवेश नाकारून दुसऱ्या लांबच्या मार्गाने वळवले जाते. एकाच देवाला भेटण्यासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये असा दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात असून या भेदभावामुळे मंदिर परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
व्यापाऱ्यांचा आक्रमक पवित्रा
या निर्णयाचा सर्वात जास्त फटका मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांना बसत आहे. मुख्य महाद्वारातून भाविकांची ये-जा बंद झाल्याने व्यापारावर परिणाम होत आहेच, पण त्यासोबतच भक्तांची होणारी गैरसोय व्यापाऱ्यांच्या संतापाचे मुख्य कारण ठरली आहे. व्यापाऱ्यांनी आता थेट मंदिर प्रशासनाला आव्हान दिले आहे. राजे शहाजीराजे महाद्वार सर्वसामान्य भक्तांसाठी तातडीने खुले केले नाही, तर तुळजापूर शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. केवळ इशारा देऊनच हे व्यापारी थांबलेले नाहीत, तर जोपर्यंत सामान्य भक्ताला प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत एकाही व्हीआयपी व्यक्तीला या गेटमधून आत सोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
प्रशासनाकडून निर्णयाची अपेक्षा
तुळजापूरमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात ही संख्या लाखांच्या घरात जाते. अशा वेळी मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवल्याने भाविकांचा गोंधळ उडत असून त्यांना तासनतास लांबच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. दुसरीकडे, काही ठराविक लोकांसाठी रेड कार्पेट आणि सामान्यांसाठी वेगळी वाट, ही पद्धत महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या दरबारात नसावी, अशी भावना व्यक्त होत आहे. आता या वादावर मंदिर संस्थान काय तोडगा काढते आणि व्यापाऱ्यांच्या या अल्टिमेटमनंतर प्रशासन नमते घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world