ओमकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Delivery Woman Baby Death News : धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात एका प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाळ दगावल्याचा गंभीर आरोप मृत बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे.दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर येथील कविता प्रविण जगताप या महिलेला प्रसूतीसाठी धाराशिव येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नातेवाईकांच्या माहितीनुसार,प्रसुतीदरम्यान महिलेची प्रकृती गंभीर होत असल्याचे वारंवार डॉक्टरांच्या निदर्शनास आणण्यात आले.बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकलेली असून गर्भाशयाचे तोंड अपेक्षित प्रमाणात उघडत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते.अशा परिस्थितीत आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,हे माहीत असूनही संबंधित डॉक्टरांनी तत्काळ सिझेरियन शस्त्रक्रिया केली नाही,असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणच्या 'या' चौकात तुफान हाणामारी, आजीबाई मध्यस्थी करायला गेल्या अन् भलतच घडलं, CCTV Video
सिझेरियन करण्यात टाळाटाळ करण्यात आली आणि..
कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार,वारंवार विनंती करूनही सिझेरियन करण्यात टाळाटाळ करण्यात आली आणि उपचारात अनावश्यक विलंब झाला.याच विलंबामुळे बाळाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि अखेरीस बाळाचा मृत्यू झाला,असा आरोप करण्यात आला आहे.यासोबतच डिलिव्हरीच्या वेळी डॉक्टर आणि नर्स यांनी गर्भवती महिलेला मारहाण केल्याचाही धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नक्की वाचा >> Success Story : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, रत्नागिरीच्या तरुणीचा जगभरात डंका, गोल्ड मेडल पटकावलं
धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण
संबंधित महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या लेखी तक्रारीनुसार,प्रसुतीदरम्यान दोन पुरुष कर्मचाऱ्यांनी पोटावर आणि पाठीवर दाब दिला.तसेच विरोध केल्यानंतर एका डॉक्टरने मृत बाळाच्या आईला थप्पड मारली,असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधित महिला डॉक्टर,नर्स आणि जबाबदार वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.दरम्यान,या घटनेनंतर जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.मृत बाळाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत,यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी,अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world