संजय तिवारी, प्रतिनिधी
Tiger Killed : विदर्भात वाघांची शिकार आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणी चर्चेत असलेल्या अजित राजगोंड याचे मूळ नाव अजित सियालाल पारधी आहे. वन्य प्राण्यांची प्रत्यक्ष शिकार करणे किंवा कोणी सधन शिकारी आला तर त्याला सहायता करणे हे त्यांचे पारंपरिक काम असल्याचे सांगितले जाते. तो आणि त्याच्या टोळीतील अधिकांश आरोपी हे बहेलिया समाजाचे असल्याने त्यांना वन्य प्राणी विषयक वर्तुळात बहेलिया गँग हे नाव पडले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बहेलिया हे एका जमातीचं नाव आहे. विशेषतः मध्यप्रदेश येथील जंगल लगतचे परिसर, उत्तर प्रदेश आणि इतरत्र समाजाचे वास्तव्य असून या समाजातील लोक फार पूर्वीपासून पोपट आणि विविध रंगाच्या पक्ष्यांना विकण्याचे कार्य करताना दिसून येतात. आपल्याकडे असे किंवा मोरपंख विकणारे, जंगलातील शुद्ध आणि ताजे मध विक्रेते कधी कधी दिसून येतात. ते अधिकांश याच समाजाचे असतात. वन्य क्षेत्रातील खडा न खडा माहिती असल्याने बहेलिया समाजातील जाणकार लोकांची शिकारी टोळ्यांमध्ये मोठी मागणी असते. अगदी शे दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत या समाजाचे काही पारंगत लोक कबुतर किंवा अन्य पक्ष्यांना संदेशवाहक या रूपात प्रशिक्षित करून त्यांचेकडून पोस्टमन सारखी कामे करवून घेत.
नक्की वाचा - Tiger Killed : बहेलिया टोळीकडून वाघांच्या हत्येचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, चीनमध्ये प्रवासाची शक्यता, देशभर रेड ॲलर्ट
मूळच्या आदिवासी परंपरेतील या समाजाच्या लोकांना पिढ्या न पिढ्या चालत आलेले वन्य जीवांविषयी सखोल ज्ञान माहित असते. इतिहासातील नोंदी सांगतात की, जंगलांव्यातिरिक्त बहेलिया समाजातील लोकांना पारंपरिक रित्या राखणदार किंवा सैन्यात सैनिक अशा कामांवर ठेवण्यात येत असे. त्याशिवाय, ते आक्रमक, धाडसी आणि क्रूर स्वभाव असल्याचे आणि त्यांनी कित्येक युद्धांत शौर्य प्रदर्शन केल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. 1857 च्या प्रथम स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मध्यप्रदेशात सतना नजिकच्या पिंडरा गावातील बहेलिया समाजातील लोकांनी शौर्य दाखवल्याचे आणि मोठ्या संख्येने हौतात्म्य पत्करल्याचे इतिहासातून कळते.