गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाने त्या हॉटेल मालकाला सांगितले. या क्षुल्लक गोष्टीचे रुपांतर वादावादीत होऊन हॉटेल मालकासह अन्य 5-6 जणांनी त्या पर्यटकाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान मारहाण करणाऱ्या तन्वीर करामत शेख, शराफत अब्बास शेख, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, परवीन शराफत शेख, साजमीन शराफत शेख आणि तलाह करामत शेख राहणार झाराप खान मोहल्ला कुडाळ यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ झाराप येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीनंतर कुडाळ पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
दोरीने बांधून ठेवलेल्या व मारहाण झालेल्या पर्यटकाने तक्रार दाखल केली नव्हती, मात्र पर्यटन जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कुडाळ पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी हे बांगलादेशी तर नाहीत ना याचेही कसून चौकशी केली जाईल, असं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
(नक्की वाचा- Zero Click Malware : 'झिरो-क्लिक' मालवेयरचा म्हणजे काय? ऑनलाईन फसवणुकीसाठी कसा वापर होतेय?)
मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे- केसरकर
माजी मंत्री दिपक केसरकर यांनी पर्यटकाला झालेली मारहाण ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे, त्यामुळे असे प्रकार घडता कामा नयेत. ज्याने कोणी ही मारहाण केलीय त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री दिपक केसरकर यांनी पर्यटकाला झालेल्या मारहाणीवर दिली आहे.
(नक्की वाचा- Election Results 2025 LIVE Updates: "विकास आणि सुशासन जिंकलं", दिल्लीतील विजयावर PM नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया)
जिल्ह्याची बदनामी होऊ देणार नाही- नितेश राणे
पोलीस प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतली आहे. मी स्वतः या संदर्भात माहिती घेतलेली आहे. फूड अँड सप्लाय खात्याशी मी बोललो आहे. मालकाने परवानगी घेतली आणि दुसऱ्याला चालवायला दिलेला आहे. फलक कोणत्या दुसऱ्याच नावाने लावलेला आहे. अशा हेराफेरी करणाऱ्या लोकांचे हॉटेल्स आपल्या जिल्ह्यात असू नयेत. या एका घटनेमुळे जिल्ह्याची बदनामी होऊ देणार नाही, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका
पर्यटकाला मारहाण झाल्यानंतर कुडा शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. आपल्या जिल्ह्यात यापुढे पर्यटकांना मारहाण झाल्यास आपण खपवून घेणार नाही, अशी भूमिका व्यापारी संघटनेने घेतली आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसात व्यापारी संघटना जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करणार आहेत.