नजीर खान, प्रतिनिधी
Parbhani News : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू असून अनेक ठिकाणी छापेमारी आणि नमुने तपासणीची मोहीम राबविली जात आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात मात्र सर्रास भेसळयुक्त दूध आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे राज्यभर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पूर्णा शहरातील परिस्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत नरहरी महाराज चौक, सोनार गल्ली, मारुती मंदिर परिसर, आनंदनगर चौक तसेच विविध गल्लीबोळांमध्ये खुले दूध विकणाऱ्या काही विक्रेत्यांकडून भेसळयुक्त दूध विकले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरात कोणत्याही प्रकारची प्रभावी तपासणी होत नसल्याने अशा विक्रेत्यांचे फावले असल्याचा आरोपही होत आहे.
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण...
दरम्यान, एका नागरिकाने विकत आणलेले दूध घरी गरम केल्यानंतर ते रबरासारखे चिकट आणि घट्ट झाल्याचा दावा करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दूधाचे नमुने तपासावेत, अशी मागणी होत आहे. याशिवाय शहरातील काही डेअरी, हॉटेल तसेच मिठाई विक्रेत्यांकडून भेसळयुक्त दूध, खवा, पनीर, तूप आणि निकृष्ट दर्जाच्या मिठाईची विक्री होत असल्याचेही आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या काळात अशा पदार्थांमुळे अन्नातून होणारे आजार वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नियमित तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पूर्णा येथे यापूर्वीही तुकाराम मुंढे यांच्या धाडसत्राच्या चर्चेनंतर पूर्णा शहरातील काही बेकरी व्यावसायिकांनी ब्रेड आणि इतर बेकरी साहित्य फेकून दिल्याचा प्रकार घडला होता.
मात्र त्यानंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचे चित्र दिसत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या राज्यभर भेसळीविरोधात कठोर कारवाईचे संदेश दिले जात असताना पूर्णा शहरातही अन्न व औषध प्रशासनाने तातडीने संयुक्त तपासणी मोहीम राबवून दूध, खवा, पनीर, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासावेत, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world