सध्या संपूर्ण राज्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. घरघुती गणपती बरोबरच सार्वजनिक गणपतीही विराजमान झाले आहेत. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे ज्या गावात गणेशोत्सव केला जातो. पण घरात किंवा सार्वजनिक मंडळात गणपती बसवला जात नाही. हे गाव सातारा जिल्ह्यात आहे. त्या मागची कथाही रोचक आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या गावामध्ये अशाच पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील अंगापूर तर्फ व अंगापूर वंदन ही शेजारी-शेजारी असणारी दोन गावे. जुळ्या भावंडांप्रमाणे जणू! दोन्ही गावांच्यामध्ये फक्त एक ओढा! दोन्ही गावांत गणपतीची प्राचीन मंदिरे आहेत. दोन्ही गावांची मिळून ८ हजार लोकसंख्या आहे, पण इथल्या एकाही घरात गणपती बसविला जात नाही, अथवा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही. मात्र दोन्ही गावांतील गणपती मंदिरांमध्ये भद्रोत्सव साजरा केला जातो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोरया म्हणा दोऱ्या म्हणा च्या जयघोषाने अंगापूरचा परिसर दुमदुमून गेला . संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र, अंगापूरचा गणेशोत्सव म्हणजे आगळावेगळा भद्रोत्सव साजरा होतो. भाद्रपद प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव अनेक दिवस चालतो. या निमित्ताने अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ या दोन्ही गावांमध्ये असणाऱ्या प्राचीन गणपती मंदिरामध्ये धूप आरती, भजने, कीर्तने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. गणेश चतुर्थी व पंचमी हे दोन दिवस मुख्य उत्सवाचे असल्याने या काळात भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागतात.
एका दिवसात अंगापूर, फडतरवाडी, लिंबाचीवाडी येथील युवकांनी अंदाजे 60 ते 65 किलोमीटर अंतर अनवाणी पायांनी चालत प्रदक्षिणा पूर्ण करत परिसरातील दैवतांना जलाभिषेक करतात.या प्रदक्षिणेत जवळपास हजारो युवक सहभागी होतात.गणपतीचे उपासक यांनी प्रज्वलित भगतपात्र डोक्यावर घेऊन अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ या दोन गावांतून मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात ‘मोरया म्हणा दोरया' च्या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावर एकच गर्दी केली होती.
ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार
अंगापूर तर्फ गावातील या गणेशाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. 350 वर्षांपूर्वी अंगापूर तर्फ गावातील सुवर्णकार समाजातील गणेश भक्त दर्शनास संकष्टी चतुर्थीला मोरगावला पायी जायचे. बरीच वर्ष त्याचा हा नित्यक्रम सुरू होता. सुवर्णकार वृद्ध झाल्यानंतर त्यांनी विचार केला, की आता आपणास एवढे चालणे होणार नाही. म्हणून एका चतुर्थीस गेल्यावर त्याने गणेशाला आपले मनोगत सांगितले. हे मयुरेश्वरा आजपर्यंत मी तुझी सेवा केली परंतु वृद्ध झाल्याने आता यापुढे ती सेवा शक्य होणार नाही. त्यावेळी मयुरेश्वर त्याला दृष्टांत दिला की मी तुझ्याबरोबर येत आहे, पण तू मागे वळून पाहू नको. नाहीतर मी तेथेच थांबेल. गणेशभक्त अंगापूरला परत येण्यास निघाला. तो अंगापूरजवळ आला व तेथे त्यांनी मागे वळून पाहिले. तेथेच गणेश अदृश्य झाले.
ट्रेंडिंग बातमी - Bhumre Vs Khaire : गणपतीसमोर मान-अपमानाचं राजकारण, खैर-भुमरे स्टेजवरच भिडले
सुवर्णकाराने ही घटना गावकऱ्यांना सांगितली. ज्या ठिकाणी गणेश अदृश्य झाले, त्या ठिकाणी गावकऱ्यांनी उकरून पाहिले असता गणेशाची मूर्ती सापडली होती. त्याच ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. अशी आख्यायिका सांगितली जाते. या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने इथं येतात.