महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतींपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जाते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 2014 ला मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली त्यात यशही आले. याही वेळी त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मात्र ही निवडणूक त्यांना सोप्पी नाही. गेल्या पाच वर्षात भाजपा नेते अतुल भोसले यांनीही जोरदार तयारी केली आहे. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करण्यात अतुल भोसले यांचा सिंहाचा वाटा होता. पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघातच घेरण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. अतुल भोसले यांना ताकद दिली आहे. कोट्यवधींची विकास कामे अतुल भोसलेंनी कराड दक्षिणमध्ये आणली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पृथ्वीराज चव्हाण यांची क्लिन इमेज ही त्यांची जमेची बाजू आहे. अभ्यासू व हुशार राजकारणी म्हणून पृथ्वीराज चव्हाणांकडे पाहिले जाते. मुख्यमंत्रीपदाच्या काळात अठराशे कोटीची विकास कामे कराड दक्षिणमध्ये त्यांनी आणली होती. 2019 मध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 92 हजार 525 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 2 लाख 10 हजार 224 होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण या जागेवरून विजयी झाले होते. त्यांना एकूण 92 हजार 296 मते मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.अतुल भोसले यांना 83 हजार 166 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांचा 9 हजार 130 मतांनी पराभव झाला.
ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार
2014 मध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 76 हजार 153 मतदार होते. पृथ्वीराज चव्हाण या जागेवरून विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण 76 हजार 831 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार विलासराव पाटील पराभूत झाले होते. पृथ्विराज चव्हाण यांनी 16 हजार 418 मतांनी पराभव केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा यशवंत विचारांचा किंवा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपची लाट आली तरी या मतदारसंघाने काँग्रेसचाच आमदार निवडून दिला आहे. आजवर येथून दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील -उंडाळकर यांनी नेतृत्व केले. तर सध्या काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करीत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - राजुरा विधानसभेत तिरंगी लढतीत कोणाचा फायदा? धोटे -चटप लढत रंगणार?
भाजपचे नेते डॉ.अतुल भोसले यांनी यापूर्वी 2 वेळा कराड दक्षिणमधून नशीब आजमावले. पण त्यावेळी त्यांना यश आले नाही. मात्र त्यांनी आपली चिकाटी सोडलेली नाही. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी सातत्याने विकास कामे व समाजकार्याचा धडाका सुरू ठेवला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच कराड दक्षिण अशी मतदार संघाची ओळख आहे. पण ही ओळख पुसण्यासाठी अतुल भोसलेंकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघ हा पहिल्यापासुन आजअखेर कॉंग्रेसच्या विचारांचा राखण्यात नेत्यांना यश आले आहे. या मतदार संघाचे आत्तापर्यंत फक्त यशवंतराव चव्हाण, विलासराव पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण या तीनच नेत्यांनी नेतृत्व केले. सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघापैकी कराड दक्षिण हा एकमेव कॉंग्रेसचा मतदार संघ आहे.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
त्या मतदार संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांना अॅड.उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या रयत संघटनेचीही साथ मिळाली आहे. सातारा जिल्हा बँकेतील राजकारणानंतर आमदार चव्हाण आणि अॅड. उंडाळकर गटाने बाजार समितीची निवडणूक एकत्रीत लढत सत्ता ताब्यात ठेवली. भाजपचे अतुल भोसले यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. कराड दक्षिण हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला इथून मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे अतुल भोसले यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांनी आता यावेळी विधानसभा जिंकायचीच असा निर्धार केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world