विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापुरातल्या दक्षिण मतदार संघात उमेदवारांची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे. लोकसभेनंतर या मतदारसंघातील उमेदवार विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने या मतदार संघात बाजी मारलेली होती. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी बाजी मारत अमल महाडिक यांना आस्मान दाखवले होते. या मतदार संघात पुन्हा या दोघांमध्येच लढत होण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापुरातल्या दक्षिण मतदार संघाची निवडणूक अत्यंत चर्चेची असते. जिल्ह्यातल्या दोन दिग्गज नेत्यांचे जवळचे नातेवाईक या मतदारसंघात आमने -सामने असतात. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील तर भाजपकडून खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक असा हा लढा असतो. यंदाही या मतदारसंघात ही दोन्ही नावं पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी चर्चा आहे. दोन्ही उमेदवारांनी लोकसभेनंतर जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झालेले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चर्चेतील उमेदवार?
विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक अशी दुरंगी लढत या मतदारसंघात चर्चेत आहे. ऋतुराज पाटील हे सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. या मतदारसंघातील तरुण उमेदवार म्हणून पाटील यांची ओळख आहे. पहिल्याच टर्मला ते विजयी झाले होते. तर दुसरे प्रतिस्पर्धी अमल महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू आहेत. 2014 च्या टर्मला त्यांनी देखील पहिल्याच टर्मला विजय मिळवला. ऋतुराज पाटील हे काँग्रेसकडून तर अमल महाडिक हे भाजपकडून लढणार आहेत हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पाटील विरूद्ध महाडीक ही पारंपारीक लढत पुन्हा एकदा कोल्हापुरकरांना अनुभवायला मिळणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
दक्षिण मतदारसंघ आढावा
कोल्हापुरातील प्रमुख मतदार संघा पैकी एक हा दक्षिण मतदार संघ आहे. 2024 च्या लोकसभेतील आकडेवारीनुसार 3 लाख 44 हजार 659 इतके मतदार या मतदार संघात आहेत. या मतदार संघात मराठा, ओबीसी, धनगर, अनुसूचित जाती-जमाती असे मिश्र मतदार आहेत. मराठा समाजचं बऱ्यापैकी वर्चस्व असलेलं या मतदार संघात पाहायला मिळतं. या मतदारसंघाची भौगोलिक विभागणी निम्मा शहरी आणि निम्मा ग्रामीण अशी आहे. 2009 साली मतदारसंघ तयार झाला. त्यापूर्वी हा मतदारसंघ करवीर मतदारसंघाचा भाग होता.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?
गेल्या निवडणुकीत कोण विजयी?
2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 74. 97 टक्के मतदान झालं. 2 लाख 43 हजार 645 एवढं एकूण मतदान झालं होतं. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील हे विजयी झाले. पाटील यांना या निवडणुकीत 1 लाख 40 हजार 103 इतकं मतदान झालं. त्यांच्या विरोधात भाजप उमेदवार माजी आमदार अमल महाडिक हे होते. महाडिक यांना 97 हजार 394 इतकं मतदान मिळालं. याच निवडणुकीत तीन नंबरला राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं 2 हजार 219 तर नोटाला 1 हजार 939 इतकं मतदान झालं. यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई झाली तर मताधिक्य हा विषय चर्चेचा असेल.
ट्रेंडिंग बातमी - जागा एक इच्छुक अनेक! पुरंदर विधानसभेची लढत गाजणार?
दक्षिण मतदारसंघात राजकीय गणिते काय?
दक्षिण मतदार संघात मराठा समाजाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. याच मतदारसंघात महापालिकेतील 17 प्रभाग येतात. गेल्या निवडणुकीतील दोन्हीही उमेदवार मराठा समाजाचे होते. जिल्ह्यातील चर्चेची दोन्ही घराणे असल्यामुळे दोघांची ताकद देखील तुल्यबळ आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महाडिक यांच्या गटातील काहींना फोडून त्यांचा पाठिंबा मिळवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाडिक यांनीही अनेक वर्षे पाटील यांच्या पाठीशी असलेल्यांना आपल्या बाजूने वळवले. धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश आणि लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून भाजपवरच झालेल्या टीकेचा व्हिडिओ विरोधकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. यंदाही हीच राजकीय गणित सुरू आहेत. काही गावातील महाडिक आणि पाटील यांच्याकडून सरपंच आणि सदस्यांना फोडण्यात येत आहे. जनसंपर्क, गटबाजी, राजकीय हेवेदावे आणि वर्चस्व हे मुद्दे या मतदार संघातील चर्चेचे आहेत.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?
आकर्षक टॅगलाईन आणि पक्षाचं बळ
2019 च्या लोकसभेत शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांना सतेज पाटील यांनी मदत केली होती. मंडलिक यांनी विधानसभेत काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला. विजयी उमेदवाराची 'आमचं ठरलंय, दक्षिण उरलंय' ही टॅगलाईन या निवडणुकीत लक्षवेधी ठरली. सतेज पाटील यांच्या जनसंपर्क, विविध गटा-ताटांच्या राजकारणाचा फायदा झाला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपचं कार्ड घेऊन अमल महाडिक हे आमदार झाले होते. यंदा या भाजप कार्डचा कितपत फायदा होतोय हे पाहावं लागणार आहे.
दक्षिण मतदारसंघाची निवडणूक का चर्चेत असते?
महाडिक विरुद्ध पाटील अशी थेट लढत दक्षिण मतदार संघात होत असते. 2019 च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी ऋतुराज यांच्या विजयाने पाटील घराण्याची आमदारकीची दुसरी टर्म मिळवली. यंदा महाडिक घराण्याला हे रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. जिल्ह्यातील दोन घराण्यासाठी महत्वाची अशी ही निवडणूक आहे. ऋतुराज पाटील हे जरी उमेदवार असले तरी प्रतिष्ठा ही सतेज पाटील यांची पणाला लागलेली असेल. ऐन वेळी काँग्रेस त्यांनाही निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world