संजय तिवारी, नागपूर
विदर्भासह, मराठवाडा, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली भागाला मागील 5 ते 7 दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. 42 ते 45 सेल्सिअर अंशावर गेलेल्या विदर्भात अवकाळी पावसाने थोडा गारवा आला. मात्र गावकऱ्यांचे आणि शेतीचे बरेच नुकसान झाले आहे.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया प्रामुख्याने या चार जिल्ह्यांत मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. वेगवगळता ठिकाणी ते पाच दिवस यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले तर वादळी वाऱ्यामुळे कित्येक लोकांच्या घरांचे छप्पर उडाले. कच्च्या घरांची पडझड झाली आणि गुरांचे गोठे पडले, असे बरेच प्रकार घडले आहेत. या चार जिल्ह्यांत ओलिताची शेती असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकांची लागवड केली होती. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा हाताशी आलेला घास देखील हिरावला गेला आहे. आंबे आणि मुगाचे देखील नुकसान झाले आहे. गडचिरोलीत तीन दिवस विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. शेतात मका आणि मिरची होती. हातात आलेला मका अवकाळीने खराब केला आहे. वर्धा जिल्ह्यात तब्बल सात दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू असल्याने शेतीतील पपई, कांदा, भुईमूग पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पश्चिम विदर्भात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि सिंदखेड राजा या दोन तालुक्यांत प्रामुख्याने नुकसान झाले. वीज कोसळून 3 जनावरे दगावली 2 जखमी झाले. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे परिसरात असलेल्या उन्हाळी मूग, उडीद, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. उन्हाळी मुगाचे पीक झोपले असून गारांचा फटका बसल्याने मुगाच्या शेंगा काळ्या पडत आहेत. परिणामी उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि महागाव तालुक्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. कोरडवाहू शेती असल्याने फारसे पीक नसल्याने तितके नुकसान झाले नाही.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
वाशिम, अकोल्यातही अवकाळीने नुकसान
रिसोड तालुक्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह जोरदार वादळी अवकाळी पाऊस झाला. मार्केट यार्डातील धान्य आणि शेतीमाल भिजला. अकोल्यातही मागील तीन दिवसापासून अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालाय.. यामध्ये बाळापूरच्या वाडेगावात आंब्याच्या झाडाचे फळ मोठ्या प्रमाणात गळती होऊन नुकसान झालं.. तर तेल्हारा तालुक्यात काही भागात केळी पिकाचे मोठे नुकसान झाले, यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ही समावेश असून त्याचेही नुकसान झाले आहे.
ट्रेंडिंग बातमी - भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर
अमरावती
अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाचे सावट, जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने संत्रा, कांदा पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या सर्व ठिकाणी कमी अधिक प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी आल्या. मात्र, विद्युत पुरवठा लवकरच पूर्ववत झाला. शेतकरी आणि गावकऱ्यांना पंचनामे लवकर होऊन नुकसान भरपाई लवकर मिळावी, अशी अपेक्षा आहे. येत्या चार-पाच दिवसात नुकसान झालेल्या शेतीचे आणि घरांचे पंचनामे पूर्ण करून तसा अहवाल शासनाला पाठवला जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.