जाहिरात
Story ProgressBack

8 वेळा परीक्षा दिली पण खचला नाही, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलगा जिद्दीनं झाला UPSC पास

प्रशांतची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. चाळीच्या घरात राहणारा प्रशांत एकत्र कुटुंबात वाढलेला. त्यामुळे अभ्यासाला कुठेही शांतता मिळत नसे.

Read Time: 3 min
8 वेळा परीक्षा दिली पण खचला नाही, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलगा जिद्दीनं झाला UPSC पास
ठाणे :

घरची परिस्थिती अतिशय बेताची. आई ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी तर वडील बिगारी कामगार. ठाणे येथील खारटन रोडवरील चाळीच्या घरातच तो शिकला. आठ वेळा यूपीएससीची परीक्षा दिली मात्र सतत अपयश आलं. परंतु हा मुलगा थांबला नाही की खचला नाही. त्याने अखेर यश आपल्यापाशी खेचून आणलं. ही कहाणी आहे प्रशांत भोजने या यूपीएससी पास झालेल्या विद्यार्थ्याची.  

चाळीत राहणाऱ्या प्रशांतने असं घेतलं शिक्षण 
प्रशांतची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. चाळीच्या घरात राहणारा प्रशांत एकत्र कुटुंबात वाढलेला. त्यामुळे अभ्यासाला कुठेही शांतता मिळत नसे. ठाण्यातील मो. ह.  विद्यालयात प्रशांतचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर प्रशांतने दत्ता मेघे इंजिनियर कॉलेजमधून इंजीनियरिंग केलं. मात्र प्रशांतच्या वडिलांनी कलेक्टर झालास तर मानसन्मान, पैसे आणि विशेष म्हणजे देशाची सेवा करायला मिळेल. फुले शाहू आणि आंबेडकरांचे विचार साऱ्या समाजात पसरवता येतील याचे बाळकडूच प्रशांतला पाजले होते. ध्येयाच्या पाठीमागे धावताना प्रशांतला अनेक अडचणींवर मात करावी लागली. पण तो डगमगला नाही. 

असा केला अभ्यास 
प्रशांतने सुरुवातीला तीन वर्ष स्वतःचा अभ्यास स्वतः केला. त्यासाठी त्यांनी चाळीतल्या घरामध्ये आजूबाजूला असलेल्या गोंधळापेक्षा लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करणे पसंत केले. मात्र त्यानंतर त्याला बारटी या सरकारी संस्थेबद्दल समजले. त्यानुसार त्यांनी या संस्थेची परीक्षा दिली. ती तो पास झाला त्यानंतर संस्थेने त्याला मदत केली. त्यानंतर त्याने दिल्ली येथे जाऊन प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तो दिल्ली येथील यूपीएससीच्या क्लासमध्ये शिकवायला जात असे. शिकवता शिकवता त्याला शिकताही येत होते. जवळपास रोज तो दिवसाचे 12 तास अभ्यास करत असल्याचं त्याने सांगितलं. 

नापास झाल्यानंतर वडील धीर देत... 
पहिले तीन वर्ष मी स्वतःचा अभ्यास स्वतः करत असल्यानं मला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नव्हतं. त्यामुळे मी सातत्याने नापास होत राहिलो, त्यानंतर देखील नेमका अभ्यास कसा करावा या संदर्भात मला मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे सातत्याने अपयश पदरात पडत होते आणि ते पचवणे मला अतिशय कठीण जात असे. मात्र  परिवार, नातेवाईक आणि मित्रमंडळीने मला खूप धीर दिला. माझे वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कितीही वर्ष लागली तरी तू ही परीक्षा पास कर. पुन्हा अभ्यासाला लाग. मी तुझ्या पाठीशी आहे असे ते मला सातत्याने सांगत राहिले. त्यामुळे आज मी हे यश पाहू शकलो, अशी भावना प्रशांत भोजने यांनी व्यक्त केली.  

हे ही वाचा-UPSC निकालानंतर कच्चा घरातील सेलिब्रेशन डोळ्यात पाणी आणणारं!

प्रशांतची मुलाखत कशी झाली?
प्रशांतला ठाणे येथे राहत असल्याने ठाण्याच्या रेल्वे स्थानकासंदर्भात प्रश्न विचारला होता. जवळपास 25 ते 30 मिनिटं मुलाखत चालली. प्रशांतला 30 ते 35 प्रश्न विचारण्यात आले. प्रशांत धीराने या प्रश्नांना सामोरे गेला आणि ही परीक्षा उत्तीर्ण केली.

देशाची सेवा करणार...
ही परीक्षा देऊन मी पास झालो, त्यामुळे आता मी देशाची सेवा करणार, याव्यतिरिक्त समाजात शिक्षणासंदर्भात जनजागृती करणार. अधिकाधिक गरीब विद्यार्थी या परीक्षांमध्ये पास व्हावेत  यासाठी प्रयत्न करीन असे प्रशांत सांगतो. मात्र हे करण्यापूर्वी आणखी एकदा यूपीएससीची परीक्षा देण्याचा माझा विचार आहे. आता माझा क्रमांक 849 वा आहे. हा क्रमांक आयएएस यादीत कसा येईल, यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावा असं वाटतं. मात्र मी अजून नक्की काही ठरवलेलं नाही. वरिष्ठांशी चर्चा करून ठरवेन असे प्रशांत सांगतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination