छत्रपती संभाजी नगर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे माजी शहर अध्यक्ष संदीप शिरसाट यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "पाच कोटी रुपये दे, अन्यथा तुझ्या कुटुंबातील सदस्यांसह तुला गोळ्या घालून जीवे ठार करू",अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. मी कॅनडामधून बोलत आहे, असे सांगत या व्यक्तीने संदीप शिरसाट यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी संदीप शिरसाट यांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा: New Criminal Laws: देशभरात 3 नवीन फौजदारी कायदे लागू, जाणून घ्या प्रत्येक मुद्दा)
संदीप शिरसाट यांनी काय सांगितले?
संदीप शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, "7 जून रोजी सकाळी 11.30 वाजेदरम्यान फोन आला. काय सुरू आहे? कसे सुरू आहे? कसा आहेस? अशी विचारणा केल्यानंतर त्याने पाच कोटी रुपयांची मागणी माझ्याकडे केली. मी विचारलं कशाबद्दल? यावर धमकी देणाऱ्या म्हटले की, तुझे प्रॉपर्टीचे काम सुरू आहे, त्याचे पैसे दे. मी म्हटलं असे काहीही सुरू नाही. तू फॉर्च्युनर आणि तुझा भाऊ बीएमडब्लू कारमधून फिरता. तर तुम्हा दोघांना मी एके-47ने गोळ्या घालून जीवे ठार करेन. मी यापूर्वी संबंधित व्यक्तीशी कधीही फोनवर अथवा प्रत्यक्ष संभाषण केलेले नाही. या व्यक्तीला मी पाहिले नाही आणि ओळखतही नाही. यानंतर 9 जून आणि 22 जूनलाही त्याच व्यक्तीचा फोन आला. पण मी उत्तर दिले नाही".
(नक्की वाचा: 'सुंदर' वरून वाद, रणजित निंबाळकरांची हत्या करणारे गौतम काकडे अटकेत)
दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आली आहे आणि पोलीस तपास करत आहेत.