मनोज सातवी, वसई:
Vasai News: प्रेमभंगाच्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वसई रेल्वे स्थानकाजवळ घडली. यावेळी माणिकपूर पोलिसांच्या प्रसंगावधानाने या तरुणाचे प्राण वाचले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पोलीस उपनिरीक्षक हरीश पाटील आणि शिपाई राजेंद्र शेलार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा...
वर्दीतील देवदूत, तरुणाचे वाचवले प्राण..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसई रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर आत्महत्या करण्यासाठी चढलेल्या एका तरुणाचे प्राण माणिकपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले आहेत. मुलीच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या 17 वर्षीय तरुणाने रात्री आत्महत्येचा निर्णय घेत स्कायवॉकच्या कठड्यावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश पाटील आणि शिपाई राजेंद्र शेलार यांना मिळाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तरुणाला बोलण्यात गुंतवून ठेवत पाठी मागून जाऊन त्याला घट्ट मिठी मारत सुरक्षितपणे कठड्यावरून खाली आणले.
दरम्यान, त्यानंतर तरुणाला पोलीस ठाण्यात नेऊन त्याचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी तरुणाच्या आई-वडिलांना बोलावून त्याला त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी वेळेवर दाखवलेल्या धाडसामुळे आणि संवेदनशीलतेमुळे माणिकपूर पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.