संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur Vitthal Temple : वसंत पंचमीनिमित्त आज पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे पंढरपुरात एकच लगीनघाई उडाली आहे. लग्नासाठी मंदिर फुलांनी एका राजवाड्याप्रमाणे सजवण्यात आलं आहे. रुक्मिणी स्वयंवराची कथा झाल्यानंतर साधारणपणे 11 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा अंतरपाठ धरून प्रत्यक्ष विवाह संपन्न होणार आहे. या विवाहसाठी सकाळपासूनच पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.
वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होत असतो. श्रीकृष्णाने अर्थातच विठ्ठलाने रुक्मिणीचे पाणीग्रहण केले. त्यापूर्वी रुक्मिणीने श्रीकृष्णाला म्हणजेच विठ्ठलाला सात श्लोकांचं पत्र पाठवले. हे पत्र म्हणजे जगातील पहिले प्रेम पत्र मानले जाते. या संपूर्ण रुक्मिणी स्वयंवर कथा आणि विवाह सोहळ्याची चित्रे 40 वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिरात लावली गेली आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहाचे सचित्र दर्शन मंदिरात घडतं. याच विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहाची सचित्र कथा काय आहे.
नक्की वाचा - New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर
काय आहे ती कथा?
रुक्मिणीने विठ्ठलाला वरलं आणि वसंत पंचमीला विवाह सोहळा पार पडला. रुक्मिणी स्वयंवराची कथा काय आहे. रुक्मिणीला स्वप्नात श्रीकृष्णाचं स्मरण झालं त्यामुळे तिने श्रीकृष्णासोबत लग्न करण्याची इच्छा आपले वडील राजा भीमक यांच्याकडे व्यक्त केली. मात्र रुक्मिणीचे भाऊ रुक्मय यांनी या लग्नाला विरोध केला. यानंतर रुक्मिणीने सात श्लोकांचे पत्र सुदैव ब्राम्हणाकरवी कृष्णाकडे पाठवलं. पुढे ब्राम्हणाने हे पत्र कृष्णाला वाचून दाखवलं. हे पत्र ऐकल्यानंतर कृष्णाच्याही मनात रुक्मिणीबद्दलचा भाव जागृत होतो.
त्या श्लोकांमध्ये रुक्मिणीने लिहिलं होतं की, मी अंबिका देवीच्या मंदिरात जाते. तिथं दर्शन घेते. तिथे तू ये. त्याप्रमाणे श्रीकृष्ण द्वारकेहून आला. श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला आपल्या रथात घेतलं. रुक्मिणीचं पाणीग्रहण केलं. यानंतर श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल आणि रुक्मय यांच्यामध्ये युद्ध झालं. यात रुक्मय अपयशी झाला. यानंतर वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठम आणि रुक्मिणीचा विवाहसोहळा पार पडला. अशी त्यामागील पौराणिक कथा आहे.
ही सर्व कथा सचित्र स्वरुपात विठ्ठल मंदिरात उपलब्ध आहे. सांगलीचे कल्याण शेटे यांनी चाळीस वर्षांपूर्वी ही चित्रे काढली आहेत.