संजय रमाकांत तिवारी, प्रतिनिधी
70 वर्षे वयाच्या लीलाबाई भोंडगे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील शेतकरी आहेत. शेतातील संत्री रस्त्यावर विकून चार पैसे कमवतात. 'कसं काय सुरू आहे' असं विचारलं तर त्या सांगतात, यावेळी माल कमी आहे तरीही भाव नाही. रस्त्यावर संत्री विकून दिवस काढायचे आहे, असे सांगून त्या गप्प बसतात.
या परिस्थितीला कारण म्हणजे विदर्भातील संत्र्यांची निर्यात आता जवळपास ठप्प झाली असून ही निर्यात आता संपूर्ण बंद होईल अशी भीती आहे. विदर्भातील संत्री उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्याचं कारण म्हणजे बांगलादेशाने पुन्हा आयात शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे संत्री उत्पादकांसोबत निर्यातदार देखील संकटात सापडले आहेत. बांगलादेशला संत्री निर्यात करणे निर्यातदारांना आता जवळ जवळ अशक्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मालाचे चांगले भाव मिळणे आता कठीण झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथील वयोवृद्ध संत्री उत्पादक शेतकरी संतोष धुर्वे सांगतात, इतकी वर्षे संत्र्यांचा व्यवसाय केला पण अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही. बांगलादेशात संत्र्यांची निर्यात होत असे. मालाला उठाव होता आणि भाव देखील चांगला मिळत होता. आता बांगलादेशाने ड्युटी वाढवली. आत देशातच जो भाव मिळेल तेवढ्यात विकून माल संपवून टाकायचा आहे. असं केलं तर नफा मिळणार नाही, मात्र फायदाही होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे संत्री शेतकरी आता संकटात आले आहेत.
नक्की वाचा - Explainer : मृत्यूचा फास! चायनीज मांजा का आहे इतका जीवघेणा? कसा होतो तयार?
संत्रा निर्यातदार राकेश मानकर हे नवअनंत शेतकरी उत्पादक संस्थेशी जोडलेले आहेत. आज संस्थेच्या आवारात कोणीच दिसत नाही. एक देखील संत्र्याची गाडी किंवा शेतकरी दिसत नाही. ते सांगतात, आंबिया बहर आता तसाही जवळपास संपला आहे आणि एक दीड महिन्यात मृग बहर येणार आहे. त्यावेळी माल कमी असेल. मुख्य गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यात संत्र्यांवरील आयात शुल्क प्रति किलो 101 रूपये होते. ते आता 116 रुपये केल्याने नैराश्य आलं आहे. काही हंगाम 75 रुपये प्रति किलो इतके होते.
बांगलादेशाला निर्यात करणारे आमच्यासारखे संत्री निर्यातदार अशाने प्रचंड अडचणीत सापडले आहेत. बांगलादेशाने भारतीय संत्र्यांवर लावलेले आयात शुल्क पाहता भारतातून बांगलादेशाला होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प होईल. आधी तर एका दिवसाला 30 ते 35 ट्रक बॉर्डरवर असत, आता तीन-चारच असतात. नव्या निर्णयाने तेही दिसेनासे होतील, असे निर्यातदार राकेश मानकर यांनी सांगितले. संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत तर आहेत. पण, बांगलादेशाऐवजी पर्यायी बाजारपेठ शोधण्याची वेळ भारतीय संत्री म्हणजे प्रामुख्याने विदर्भातील संत्री निर्यातदारांवर आली असल्याचं ते म्हणाले.