पुणे: तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन आज पुण्यात पार पडले. पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हे संमेलन होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री उदय सामंत या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रात मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल त्याविरोधात कडक कायदा झाला पाहिजे, अशी मोठी मागणी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले उदय सामंत?
"मराठी भाषेचे संवर्धन, जतन तसेच प्रचार आणि प्रचार झाला पाहिजे हा या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. मराठी भाषा आहे तशी टिकवणं, मराठी भाषेची अस्मिता टिकवणं आणि मराठी भाषेवर जर आक्रमण होत असेल तर आक्रमकपणे उत्तर देणं ही युवा पिढीची जबाबदारी आहे," असे प्रतिपादन करत उदय सामंत यांनी मराठी माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा उल्लेख करत मोठी मागणी केली.
"मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे. आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो, महाराष्ट्रत प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहातो, आपण त्यांचा पाहुणचार केला आहे, आपण त्यांचा अनादर केला नाहीये. मात्र काही लोकं जाणीवपूर्वक मराठी भाषा, मराठी माणसाला त्रास देण्याचे काम करत असेल तर त्यासाठी कडक कायदा झाला पाहीजे आणि त्यांना शासन झाले पाहीजे. मराठी भाषेची अस्मिता टीकवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून यावर कार्यवाही करावी अशी विनंती आहे," अशी मोठी मागणी उदय सामंत यांनी केली.
( नक्की वाचा : Ajit Pawar : दमानियांच्या पुराव्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार? अजित पवारांनी दिलं उत्तर )
CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितला दावोसचा किस्सा..
'साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो अथवा विश्व मराठी संमेलन असो. वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायी भाव आहे. कारण आपण संवेदनशील लोकं आहे. वाद, विवाद झालेच पाहीजे कारण त्यातूनच मंथन होऊ शकतं,' असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
'दावोसला 500-800 किलोमीटरचा प्रवास करून मराठी माणसं माझ्या स्वागतासाठी आली होती. आपला मराठी माणूस विविध देशात पोहोचला मात्र तो माय मराठीला विसरलेला नाही. मी पुन्हा येईन हा माझा पिच्छाच सोडत नाही, आधी उपहासाने म्हणायचे मात्र आता कौतुकाने म्हणतात. एखादा शब्द आपल्याला चिकटतो तेव्हा त्याचे काळवेळा नुसार अर्थ बदलत असतात. मी तुम्हाला सांगतो की हे तुम्ही ठरवलं पाहीजे की जेव्हा जेव्हा विश्व संमेलन होईल तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,' असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
(नक्की वाचा- अजित पवारांच्या समोरच राडा! धस, मुंडे सर्वांसमोर भिडले, बीड DPDC बैठक गाजली)
अजित पवारांची फटकेबाजी!
'मराठी म्हणतो तेव्हा मराठे ही संकल्पना जातीपुरता मर्यादीत राहात नाही. मराठी भाषा, बोली बोलणाऱ्या, सह्याद्रीच्या वाऱ्यांशी, महाराष्ट्राच्या मातीशी नाते असणाऱ्या अठरा पगड जाती धर्म भाषा पंथांच्या लोकांना एकत्र आणून मराठे किंवा मराठा ही संकल्पना अस्तित्वात आली. अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली ही मराठी माणसांनी भरलेली आहे. जगातील प्रत्येक देशात मराठी माणूस कतृत्व गाजवत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा हा पानिपतचा रोड मराठा आहे,' असं अजित पवार म्हणाले.
तसेच 'सुरूवात चांगली झाली, तीनही दिवस चांगले जावोत. आमच्या मराठी माणसांना दोन्ही वेळेस पोटभर जेवायला मिळो, त्यांच्या राहण्याची व्यवस्था उत्तम राहो. पुणेकरांसारखं, तुम्ही जेवूनच आला असाल, चहा घेतलाच असाल...असं करू नका. मी पण पुणेकर म्हणून सांगतोय, मला पुणेकरांचे बारकावे माहिती आहेत,' असे म्हणत अजित पवार यांनी पुणेकरांना कोपरखळीही मारली.