IRCTC Shirdi Shani Shingnapur Nashik Tour Package : जर तुम्हाला देशभरात पर्यटन करण्याची इच्छा असेल तर भारतीय रेल्वेशिवाय दुसरं कोणीच तुम्हाला चांगला पर्याय देऊ शकत नाही. महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांचं कमी काळात दर्शन करायचा असेल तर आयआरसीटीसीचं शिर्डी, शनि शिंगणापूर आणि नाशिक टूर पॅकेज एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे पॅकेज २ रात्री आणि ३ दिवसाचं असून भाविकांना साईबाबांची शिर्डी, भगवान शनिचं प्रसिद्ध मंदिर शनि शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येईल.
प्रवासाला कुठून होणार सुरुवात?
या प्रवासाची सुरुवात मुंबईतून होणार आहे. यानंतर वंदे भारत एक्सप्रेसमधून मुंबईहून शिर्डीला पोहोचणार. शिर्डी देशातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रापैंकी एक आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांना शनि शिंगणापूरला घेऊन जाण्यात येईल. अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणची आणखी एक ओळख म्हणजे या गावातील घरांना पारंपरिक दरवाजे नसतात.
त्र्यंबकेश्वरचंही दर्शन घेता येणार...
यानंतर नाशिकच्या दिशेने प्रवासाला सुरुवात होईल. नाशिक धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण शहर मानलं जातं. येथील त्र्यंबकेश्वर मंदिर शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला तीन मुखं आहेत, जी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत. त्यामुळेच हे मंदिर भक्तांमध्ये विशेष श्रद्धेचं केंद्र राहिलं आहे.
IRCTC च्या या पॅकेजमध्ये येण्या-जाण्याचं ट्रेनचं तिकीट, शिर्डी आणि नाशिकमध्ये हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था, दोन वेळेसचा नाश्ता आणि दोन वेळेसचं रात्रीचं जेवण, स्थानिक भ्रमंती, ट्रान्सफर, जीएसटी आणि ट्रॅव्हल इन्शूरन्स याचा समावेश आहे.
ही यात्रा दर शुक्रवारी आयोजित केली जाते आणि प्रवासी त्यांच्या सोयीनुसार चेअर कार किंवा एक्झिक्युटिव्ह चेअर कार या वर्गांपैकी एकाची निवड करू शकतात. मंदिराच्या प्रवेश तिकिटांचा खर्च, विशेष दर्शन शुल्क, वैयक्तिक खर्च, रूम सर्व्हिस आणि इतर सुविधांचा खर्च प्रवाशांना स्वतः उचलावा लागेल.
खर्च किती होणार?
पॅकेजची किंमत निवडलेली कॅटेगरी आणि थांबण्याच्या व्यवस्थेनुसार वेगवेगळी आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर कार श्रेणीमध्ये सिंगल ऑक्युपेन्सीसाठी २२,८५० रुपये, ट्वविन शेयरिंगसाठी १६,१०० आणि ट्रिपल शेयरिंगसाठी १४,८५० रुपये प्रति व्यक्ती शुल्क ठरविण्यात आलं आहे. तर चेयर कार श्रेणीमध्ये सिंगल ऑक्युपन्सीचं शुल्क २०,३५० रुपये, ट्वविन शेयरिंगसाठी १३,४७५ रुपये आणि ट्रिपल शेयरिंगचं १२,२५० रुपये प्रति व्यक्ती. लहान मुलांसाठी डिलक्स ११,९७५ आणि चेयर कार ९३५० रुपये. लहान मुलांसाठी ५ ते ११ वयोगट देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world