मोसीन शेख, बीड: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला काल रात्री बीडच्या केज न्यायालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा झालेल्या या सुनावणीमध्ये कोर्टाने वाल्मिक कराडला 15 दिवसांच्या सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आली. यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत खंडणी प्रकरणात कराडचा संबंध नसल्याचा दावा केला.
कोर्टात काय घडलं?
मंगळवारी रात्री उशिरा बीडच्या केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराडची सुनावणी पार पडली. त्याआधी सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी ही केस लढण्यास नकार दिल्याने मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर जे बी शिंदे यांनी सरकारची बाजू मांडली तर आरोपी वाल्मीक कराड यांचे वकील म्हणून अशोक कवडे यांनी युक्तिवाद केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तीवाद..
वाल्मिक कराडचे खंडणी प्रकरणात राजकीय द्वेषापोटी नाव गोवण्यात आले असून दोन कोटींची खंडणी मागितलेला फक्त आरोप आहे, असा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केला. कराड आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे पण कोठडी नको, पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागणं चुकीचे आहे, असं त्यांच्या वकिलांनी म्हटले.
तसेच वाल्मीक कराड हे सरेंडर झाले आहेत त्यांना न्यायालयीन कोठडी द्या. दोन कोटींची खंडणी मागितली मात्र पैसे दिलेत का हे सांगावे. वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता आहे, तसेच तो गरीब राजकारणी आहे असा देखील युक्तिवाद यावेळी करण्यात आला.
सीआयडीचा युक्तीवाद..
संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार आहे त्यामुळे कराडची कोठडी महत्त्वाची आहे. कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणे हे कठीण व अवघड असून हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे हे तपासायचे आहे. या तपासासाठी कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सीआयडीने केली.
दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली असून काही घटनांचा उलगडा आणि तपास बाकी आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.