साजन धाबे, प्रतिनिधी
Washim Kanchan River Flood : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात कांचन नदीला आलेल्या पुरामुळे कोयाळी जाधव–नेतंसा मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे.नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे मुख्य रस्ता जवळपास अर्धा किलोमीटरहून अधिक अंतरावर खचला आहे.याशिवाय या मार्गावरील दोन ते तीन लहान पूलही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.या मार्गावरून दररोज ग्रामस्थ,विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात.मात्र रस्ता खचल्याने आता नागरिकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.तर शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.
शेकडो एकर शेतजमिनीचं झालं नुकसान
विशेष म्हणजे,मागील वर्षीही याच ठिकाणी पुरामुळे रस्ता खचला होता.त्यावेळी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करून कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र तात्पुरती दुरुस्ती करून प्रशासनाने वेळ मारून नेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.परिणामी यंदाच्या पहिल्याच मोठ्या पुरात हा रस्ता पुन्हा वाहून गेला. पुराच्या तडाख्यात केवळ रस्तेच नव्हे तर परिसरातील शेकडो एकर शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग! शहराजवळील 'या' 11 ठिकाणी धो धो बरसला, रस्त्यांवरही साचलं पाणी, VIDEO
इथे पाहा कांचन नदीच्या पुराच्या पाण्याचा व्हिडीओ
अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेली असून काही शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत. नुकतीच पेरणी केलेले सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांचे बियाणेही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी तसेच बाधित शेतकऱ्यांना पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.