राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यामुळे या सर्वांच्या काळजीत आणखी भर पडणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याचा अंदाज आहे.
विदर्भाला पावसाचा तडाखा
वाशिम जिल्ह्यात 8 आणि 9 एप्रिल दरम्यान अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तांडव घातला होता.या नैसर्गिक आपत्तीनं रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या पिकांसह उन्हाळी पिके, फळबागा आणि भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात 8 आणि 9 एप्रिल दरम्यान 3568 हेक्टर क्षेत्रातील पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून नुकसानाचे पंचनामे करण्याची गरज आहे.मात्र जिल्ह्यात पुन्हा पुढील दोन दिवस 'यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.
'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?
मराठवाड्यातही हजेरी
मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, जालना आणि छत्रपती नगर या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावलीय. या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या द्राक्ष आणि आंबा बागांना या पावसाचा फटका बसलाय.