कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तास सतर्क राहण्याच्या सूचना मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने केली आहे. रायगड आणि रत्नागिरीत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी 205 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई, ठाणे आणि पालघरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी २०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 10 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
(नक्की वाचा - लाडका भाऊ योजनेत बहिणीला ही संधी, समोर आली नवी माहिती)
उर्वरित महाराष्ट्रात कशी असेल स्थिती?
सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा आहे, तर साताऱ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापुरातील घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज आहे तर शहरी भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेडात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : पूजा खेडकरांच्या वडिलांनी 2 कोटींची लाच दिली ते मंत्री कोण? तक्रारदारांनी सांगितलं नाव )
या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.