मनोज सातवी, प्रतिनिधी
western railway virar dadar local : लोकल प्रवास दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालला आहे. आधीच लोकल होणारी गर्दी, विलंबाने धावणारी रेल्वे यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. आता तर त्यात अधिक भर पडल्यामुळे प्रवाशांचा पारा चढला आहे. विरार-दादर लोकल ट्रेनमध्ये एका माथेफिरुने धुडगूस घातला होता. हा माथेफिरू महिलांच्या डब्याच्या दरवाज्याला लटकलेला दिसत आहे. शिवीगाळ आणि अश्लील हावभाव करीत या तरुणाने धुडगूस घातल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
पश्चिम रेल्वेवरील गुरुवारी, 11 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता विरार-दादर लोकल ट्रेनमध्ये एका माथेफिरूने महिला डब्यातील प्रवाशांना त्रास दिल्याचं समोर आलं आहे. हा तरुण दहिसर येथे चढला. अंधेरीपर्यंत हा माथेफिरू महिलांना त्रास देत होता. हा संपूर्ण वेळ महिला भीतीच्या छायेत होत्या.
हा माथेफिरू महिलांना अश्लील शिवीगाळ, हावभाव करून धुडगूस घालत होता. या घटनेनंतर महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या माथेफिरूने ट्रेनच्या लगेज डब्यातून महिला डब्याच्या खिडकीवर आणि पत्र्यावर लाथा बुक्क्या मारून अक्षरशः दहशत निर्माण केली होती. यावेळी मदतीसाठी महिला प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइनवर फोन केला. मात्र त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा संपूर्ण भीतीदायक थरार अनुभवणाऱ्या आणि तो आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करणाऱ्या स्वरा विजय भोसले या धाडसी प्रवासी महिलेने हा सर्व प्रकार सांगितला.
कोणतीही मदत नाही...
तब्बल अर्धा तास महिलांकडून रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला जात होता. डब्यातील कित्येक महिलांनी रेल्वे हेल्पलाइन १२९, १५२१ या नंबरवर मदतीसाठी कॉल केला जात होता. मात्र महिलांना कोणतीही मदत मिळू शकली नाही.