दिवाकर माने, परभणी
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. संविधानाची ही प्रत एका माथेफिरुने मंगळवारी फाडत त्याची विटंबणा केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले आणि मारहाण केली होती. मात्र कालच्या या घटनेचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहेत.
मंगळवारीच आंबेडकरी अनुयायांनी या घटनेचा निषेधार्थ रास्ता रोको केला होता. त्यामुळे कालपासूनच परभणी शहरात काही भागात वातावरण तणावपूर्ण झाले आहे. पोलिसांनी या माथेफिरुला अटक केली आहे. परभणी शहरात कालपासून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आंदोलनाला हिंसक वळण
आज देखील आंबेडकरी अनुयायांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले, दुकानांची जाळपोळ केली. यानंतर पोलिसांनीही नागरिकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
(नक्की वाचा- "2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन", भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी)
परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेला विसावा फाटा येथे आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको केला. यावेळी जमावाने दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
परभणीत 144 कलम लागू
परभणी शहरामध्ये सुरू असलेल्या बंद दरम्यान हिंसक वळण लागल्यानंतर ,प्रशासनाने शहरात 144 कलम लागू करण्याची घोषणा केली असून ,या घोषणेनंतर जमावाला आपल्या घरी जाण्याच आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परभणी शहरात सकाळपासून शांततेत सुरू असलेला बंदला अचानक हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले, परंतु जमाव नियंत्रित होत नसल्याने, अखेर प्रशासनाने 144 कलम लागू केले आहे.
...अन्यथा परिणामास तयार रहा! - प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे.
(नक्की वाचा - 40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन)
परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे…
आरोपीवर कठोर कारवाई करण्याची गरज- सुप्रिया सुळे
परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध.