Devendra Fadnavis : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हा सस्पेन्स अखेर संपला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं गटनेतेपदी निवड झाली. आता देवेंद्र फडणवीस राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पाच डिसेंबर रोजी (गुरुवार) संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
विशेष म्हणजे फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्यापूर्वीच पाच डिसेंबर ही शपथविधीची तारीख जाहीर झाली होती. मुंबईतील आझाद मैदानात हा कार्यक्रम होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी 5 तारीखच का निवडली याचंही खास कारण आहे.
)
आपल्या देशात कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी देखील त्याला अपवाद नाही. पाच डिसेंबरला संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. ज्योतिष अभ्यासक अमित विभुते यांनी या तारखेचं महत्त्व सांगितलं आहे.
( नक्की वाचा : भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं )
काय आहे महत्त्व?
अमित विभुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 तारखेला संध्याकाळी ज्या वेळेत नव्या सरकारचा शपथविधी कार्यक्रम होतो आहे, तो शुभ काळ आहे. सध्या मार्गशिर्ष महिना सुरु आहे. हा महिना शुभ कार्यासाठी योग्य मानला जातो. पाच तारखेला संध्याकाळी पंचमी तिथी असून श्रवण नक्षत्र आहे. श्रवण हे चंद्राचं नक्षत्र आहे. राजाला राज्यकारभार करताना मनावर पूर्ण संयम असावा. त्याचं इच्छा आकांक्षावर नियंत्रण असावं. त्यामुळे त्याला राज्यकारभार करताना कोणतीही अडचण येणार नाही. तो प्रजेचं पालन-पोषण आणि संरक्षण करु शकेल.
शुभ नक्षत्र आहे. भारतावर शनीचं अधिपत्य आहे. भारताची रास देखील शनीच्या अधिपत्याखालील आहे. शनीकडे कर्मठता, एकाग्रता आणि न्यायप्रदानता हे तीन शनीचे गुण आहेत.श्रवण नक्षत्र आणि मकर रास फलदायी आहे. महाराष्ट्राला योग्य वेळी, योग्य तिथीला आणि शुभ वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होणार असून ते महाराष्ट्रासाठी शुभ फलदायी असेल, असा आमचा समज आहे,' असं विभुते यांनी स्पष्ट केलं.
( स्पष्टीकरण : या बातमीतील मते संबंधित तज्ज्ञांची आहेत. NDTV नेटवर्क त्याची कोणतीही पृष्टी करत नाही. तसंच त्याची जबाबदारी घेत नाही.)