Purandar News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक सकारात्मक अभियानाला सुरुवात झाली आहे. हे अभियान म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने एक मोठं पाऊल असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत शेतीच्या सातबारा उताऱ्यावर पतीसोबत पत्नीचंही नाव नोंदविलं जाणार आहे. महिला सर्वांगिण उत्कर्ष मंडळ (मासूम) या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.
'शेत दोघांचे' अभियान काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून महिलांचे हक्क, स्वातंत्र्य, संरक्षण आदींसाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. शेतातील ७० टक्के कामं ही महिला करीत असतात. मात्र या जमिवनीवर पुरुषाचं नाव असतं. त्यामुळे महिलांनाही शेतीवर कायदेशीर अधिकार मिळावा यासाठी शेत दोघांचे हे अभियान राबवलं जात आहे. आतापर्यंत पतीच्या निधनानंतर जमिनीच्या सातबाऱ्यावर महिलेचं नाव लागत होते. अनेकदा कर्जबाजारीपणातून पुरुष परस्पर शेती विकतात.
या मोहिमेला पुरंदर तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त मिळत आहे. आतापर्यंत ३६२ अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी १५० महिलांची नावं सहहिस्सेदार म्हणून सातबाऱ्यावर नोंद झाली आहे. या उपक्रमामुळे महिलांचा संपत्तीवरील हक्क अधिक ठोसपणे प्रस्थापित होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.