Konkan News : गोगलगायीमुळे कोकणवासियांची उडाली झोप; चिंता वाढण्याचं कारण काय?

Giant African Snail : या प्रजातीच्या प्रसाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून सिंधुदुर्गातील हवामान या आक्रमक प्रजातीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुरु दळवी, प्रतिनिधी

Dangerous snail in konkan : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आफ्रिकन स्नेल (Giant African Snail / Lissachatina fulica) आढळल्याची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात, वनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आफ्रिकन स्नेल ही जगातील 100 सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते. ही साधारण 10-15 सेमीपर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वात मोठ्या स्थलांतरित गोगलगायांपैकी एक आहे.

ही प्रजाती अत्यंत प्रजननक्षम असून एका वेळी 100-400 अंडी घालते आणि वर्षाला अनेक वेळा अंडी देऊ शकते. माती, झाडे, शेतीमाल, वाहतूक साधने यांच्यामार्फत फार जलदगतीने ती सगळीकडे पसरते. एकदा नवी जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचं वर्चस्व निर्माण करते. विशेषतः पाने, कोवळी फांदी, फळे आणि मुळे यांवर हल्ला केल्याने पिकांतुन मिळणार एकुणच उत्पन्न ढासळण्याची दाट शक्यता असते.

नक्की वाचा - Satara News : साताऱ्यात चमत्कार, मातेच्या कुशीत विसावली 7 बाळं; गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार असल्याची चर्चा

महाराष्ट्रात यापूर्वी सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यांत या प्रजातीची उपस्थिती नोंदली गेली आहे. ज्यात विशेषतः भात, ऊस आदी पिकांना मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असून फुलझाडे किंवा फळझाडे यांच्या वाहतुकी दरम्यान या प्रजातीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये प्रवेश झाला असावा असं अनिल गावडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

या प्रजातीच्या प्रसाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून सिंधुदुर्गातील हवामान या आक्रमक प्रजातीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात या प्रजातीचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या प्रजातीच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे यावेळी अनिल गावडे यांनी स्पष्ट केले आहे.