
राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News : साताऱ्यातून चमत्कारीक अशी बातमी समोर आली आहे. या बातमीने डॉक्टरांपासून नातेवाईकांना सगळ्यांनाच थक्क करून सोडलं आहे. एका मातेच्या कुशीत तब्बल सात देवदूत विसावले आहेत. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डला टक्कर देईल अशी ही घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी एक विलक्षण प्रसंग घडला. कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला आहे. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या आधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं...! गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात देवदूतांचा गोड गोंगाट सुरू झाला आहे.
अवघड अशी ही डिलिव्हरी सिझरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने अपार मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी एकाच वेळी चार बाळांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला.

सुरुवातील थोडी धाकधूक होती. मात्र सिझेरियन सुरळीत पार पडल्याने डॉक्टरांसह महिलेच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता ही घटना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देईल, अशी चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे. एका गवंड्याच्या घरी सात देवदूत अवतरले असून आता या घरात सुरू होणार आहे आनंदाचं, गोड गोंगाटाचं नव्या पर्व.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world