जाहिरात

Yavatmal News: माकडाऐवजी माणसालाच टोचलं इंजेक्शन! धक्कादायक घटनेनं वन विभागाची झोप उडाली

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात एका रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे.

Yavatmal News: माकडाऐवजी माणसालाच टोचलं इंजेक्शन! धक्कादायक घटनेनं वन विभागाची झोप उडाली
Yavatmal News : वन विभागाच्या शूटरने माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गनने निशाणा साधला होता. पण...
यवतमाळ:

Yavatmal News :  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात एका रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाने झाडलेले इंजेक्शन माकडाला लागण्याऐवजी थेट तिथे उभ्या असलेल्या एका नागरिकाला लागले. या अजब घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

माकडाचा उच्छाद आणि वन विभागाची मोहीम

उमरखेड तालुक्यातील भवानी गावात गेल्या काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने प्रचंड दहशत निर्माण केली होती. हे माकड दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करत असल्याने गावकरी भयभीत झाले होते. अखेर या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी या माकडाला जेरबंद करण्यासाठी गावात दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली.

निशाणा चुकला आणि अनर्थ घडला

वन विभागाच्या शूटरने माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गनने निशाणा साधला होता. मात्र, नेमके त्याच वेळी माकडाने अचानक हालचाल केली आणि शूटरचा अंदाज चुकला. गनमधून सुटलेले बेशुद्धीचे इंजेक्शन (डार्ट) माकडाला लागण्याऐवजी तिथे गर्दीत उभ्या असलेल्या सदानंद खराटे या 45 वर्षीय नागरिकाला जाऊन लागले. डोंगरगाव येथील रहिवासी असलेले खराटे हे हे संपूर्ण ऑपरेशन पाहत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

(नक्की वाचा : Acid Attack: शाळेतून निघाली अन् आयुष्याचं स्वप्न धूसर झालं! संगमनेरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला )
 

इंजेक्शन लागताच सदानंद खराटे हे जखमी झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाली. वन विभागाच्या या गंभीर चुकीमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

वन विभागाचे स्पष्टीकरण

या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, तसेच माकडाच्या अनपेक्षित हालचालीमुळे हा तांत्रिक बिघाड किंवा अपघात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भविष्यात अशा मोहिमा राबवताना अधिक खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com