दाभोसा धबधब्यावर स्टंट करणे बेतले जीवावर, 120 फूट खोल डोहात उडी मारल्याने पर्यटकाचा मृत्यू

जव्हारमधील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यामध्ये स्टंटबाजी करणे दोन तरुणांना महाग पडले आहे. स्टंटबाजीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी/ पालघर 

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाईमध्ये रील्स तयार करण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी काही जण थरारक स्टंट देखील करताना दिसतात. पण हे स्टंट जीवावर बेतू शकतात आणि क्षणातच होत्याचे नव्हते देखील होऊ शकते. असेच काहीसे पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये घडले आहे. जव्हारमधील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यामध्ये स्टंटबाजी करणे दोन तरुणांना महाग पडले आहे. दोन अतिउत्साही पर्यटकांनी स्टटंबाजी करण्याच्या नादात 120 फूट खोल डोहामध्ये उडी मारली. डोहातील दगडांवर आपटल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना त्यांच्याच एका मित्राच्या मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मृत पावलेल्या पर्यटकाचे नाव माझ साजिद शेख असे आहे. दरम्यान तरुणाचा मृतदेह सापडलेला नाही, शोधमोहीम सुरू असल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली आहे.  

(नक्की वाचा: 2 जूनला मेगाहाल होणार? 600 लोकल रद्द, कारण काय?)

मिरा-भाईंदरमधील रहिवासी असलेले जवळपास 24 वर्षीय तीन तरुण रविवारी (5 मे 2024) दुपारच्या सुमारास दाभोसा धबधब्याजवळ पर्यटनासाठी आले होते. यावेळेस त्यांना डोहाच्या खोलीचा अंदाज आला नाही. यातील दोन तरुण धबधब्याच्या उगम स्थानावर पोहोचले तर तिसरा मित्र डोहाच्या किनारी बसून त्यांचा व्हिडीओ शूट करत होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या डोहातील पाणी आटले आहे. तरीही या उत्साही तरुणांनी 120 फूट खोल डोहामध्ये उडी मारली आणि दुर्घटना घडली. जखमी झालेल्या तरुणाच्या कंबर, पाय आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे.  त्याच्यावर जव्हारमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.  

Advertisement

नक्की वाचा: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल

Advertisement

मुंबईसह बाहेरगावाहून येणाऱ्या हौशी पर्यटकांना पालघरमधील धबधब्यांच्या डोहाच्या खोलीचा अंदाज येत नाही. अशातच रिल्स शूट करण्याच्या नादात पर्यटकांकडून जीवघेणे स्टंट केले जातात. कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण किंवा खबरदारी न घेता पर्यटक स्टंट करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलतात. या घटना रोखण्यासाठी पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपली मुले पर्यटनासाठी कुठे जात आहेत? काय करत आहेत? याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. जेणेकरुन अशा दुर्घटना टळण्यास मदत मिळेल,असे आवाहन जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजकुमार ब्राह्मणे यांनी केले आहे.
(नक्की वाचा: धावत्या लोकलमध्ये 2 गटांत जोरदार राडा, प्रवाशाला गमवावा लागला जीव)

Advertisement

VIDEO: पहिला सिनेमा आणि झालेला प्रचंड त्रास, मधुर भांडारकर यांची शेअर केला किस्सा

Topics mentioned in this article