ऐन परीक्षेत 'शून्य शिक्षकांची शाळा'; डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या गावातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात!

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून ऐन परीक्षा सुरू असताना 'शून्य शिक्षक शाळे'मुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकललं जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
AI Image

मेहबुब जमादार, प्रतिनिधी

Raigad News : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून ऐन परीक्षा सुरू असताना 'शून्य शिक्षक शाळे'मुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकललं जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षण महत्व, 100% सुशिक्षित गाव, समाज शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असल्याचं सरकारकडून सांगितलं जात असताना ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळेतील सर्व शिक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने जिल्हा परिषद शिक्षण खात्याचा अजब कारभार समोर आला आहे.

महाड तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य आज अक्षरशः अंधारात लोटून नेते व अधिकारी बेफिकीर झाल्याचे चित्र दिसत आहे. फलोप्तादान आणि रोजगार मंत्री भरत गोगावले यांच्या मतदार संघातील ही घटना आहे. त्यांच्या मतदार संघात महाड आणि पोलादपूर तालुक्यातील 100% यश शिवसेना (शिंदे ) गटाला जिल्हा परिषद निवडणुका मध्ये दिलं असलं तरी सत्ता संघर्षात राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र आल्याने आता तेच प्रतिबिंब जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दिसत असल्याचं चित्र आहे.

Advertisement

नक्की वाचा - Mumbai-Vijaydurg : बोटीतील 4 पैकी 3 इंजिन अचानक बंद, मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी स्थगित; अचानक काय घडलं?


२७ विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात...

ही केवळ एका गावाची कथा नाही, तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये राज्यातील तिन्ही मोठे पक्ष सत्तेवर असूनही शिक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि मूलभूत व्यवस्थेतील गंभीर वास्तव अधोरेखित करणारं प्रकरण आहे. महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे कोकण एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा अनेक वर्षांपासून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा एकमेव आधार आहे. या शाळेत सध्या केवळ २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘कमी विद्यार्थी पट' हा निकष पुढे करत जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेतील सर्व शिक्षकांची एकाचवेळी बदली केली.

नियमानुसार घेतलेला हा निर्णय कागदावर योग्य वाटत असला, तरी प्रत्यक्षात त्याचे परिणाम अत्यंत गंभीर ठरत आहेत. शिक्षक नसल्यामुळे शाळा अक्षरशः ओस पडली आहे. वर्गात शिक्षक नाही, मार्गदर्शन नाही, अभ्यासाची दिशा नाही. फळ्यावरचे धडे अर्धवट राहिले आहेत, वहीतले प्रश्न अनुत्तरित आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाचे सावट आहे. शाळा चालू आहे, शिक्षण थांबले आहे. परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना सर्वाधिक गरज असते ती शिक्षकांच्या मार्गदर्शनाची. पण येथे परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. अभ्यासाचा सराव नाही, शंका निरसन नाही, पेपर पॅटर्नची माहिती नाही मग “परीक्षा कोण घेणार?”, “पेपर तपासणार कोण?”, “आम्ही पास होणार का?” — असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसले आहेत. पर्यायी शाळा लांब असल्यामुळे मुलांचे शिक्षण थांबण्याची भीती आहे.

पालकांचा संताप, आंदोलनाचा इशारा...

या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. शाळेसमोर ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. शासनाने तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी असं पालकांकडून म्हटलं जात आहे. बदलीचा निर्णय रद्द करावा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. जर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सांगताना काही ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.

Topics mentioned in this article