जाहिरात
Story ProgressBack

Loksabha Election : वृद्ध, दिव्यांगांचं मतदारांचं टेन्शन संपलं! घरुनच मतदान करण्यासाठी भरा 'हा' फॉर्म

वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना अनेकदा मतदान करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा हा त्रास संपणार आहे.

Read Time: 2 min
Loksabha Election : वृद्ध, दिव्यांगांचं मतदारांचं टेन्शन संपलं! घरुनच मतदान करण्यासाठी भरा 'हा' फॉर्म
ठाणे:

लोकसभा निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगबग सुरु आहे. देशाच्या लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावं यासाठी सरकारी यंत्रणांकडून नेहमीच मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवण्यात येते. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना अनेकदा मतदान करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा हा त्रास संपणार आहे. निवडणूक आयोगानं या व्यक्तींसाठी खास सुविधा सुरु केली आहे.

प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागाने एक विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या घरीच फिरते मतदान केंद्र जाणार आहे.निवडणूक विभागाकडून दिव्यांग आणि वयोवृद्धांची यादी तयार करण्यात आली असून 12 ड क्रमांकाचा अर्ज बीएलओंद्वारे संबंधितांना घरपोच पाठवण्यात आला आहे. अर्ज भरून दिल्यानंतर पात्र मतदारांकडे त्यांचा हक्क त्यांना बजावता येण्यासाठी टपाल मतपत्रिका त्यांच्याकडे पाठविण्यात येईल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 

कशी असेल टपाल मतपत्रिका?

टपाल मतपत्रिका पाठवताना त्यामध्ये मतपत्रिकेबरोबरच एक स्वतंत्र कक्ष,निवडणूक अधिकारी,कर्मचारी, प्रत्येक पक्षाचे स्वयंसेवक तेथे असतील. त्यामुळे याला फिरते मतदान केंद्र असे देखील आपल्याला म्हणता येईल अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली.

59 हजार मतदारांना फायदा

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात 85 वर्षांहून जास्त वयाचे नागरिक मतदारांची संख्या जवळपास 59 हजार आहे. त्या सर्वांची विधानसभानिहाय यादी तयार करण्यात आली आहे. तर 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींची यादी  बीएलओंद्वारे करण्यात येत आहे. 

'या वर्गातील काही मोजके मतदार नातलगांच्या किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या  मदतीने मतदान केंद्रांवर येऊन मतदान करतात.मात्र त्याचे प्रमाण अतिशय कमी असते.या मतदारांचा एक मोठा घटक निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहतो.घरपोच सोय उपलब्ध झाल्याने या वर्गातील मतदानाचे प्रमाण वाढेल',असा विश्वास जिल्हा निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शंभरी गाठलेले मतदार किती?

ठाणे जिल्ह्यात 90 ते 99 वयोगटातील मतदारांची संख्या 21 हजार 147 इतकी असून वयाची शंभर गाठलेले 3 हजार 152 मतदार आहेत.वयाची ऐंशी पार केलेल्या  मतदारांची संख्या 1 लाख 25 हजार 876 इतकी आहे.

अशी आहे प्रक्रिया...

निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दिलेले ‘12 ड' अर्ज पाच दिवसांच्या आत भरून द्यायचे आहेत. त्यानंतर पात्र मतदारांना टपाली मत पत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील विधान सभा मतदार संघात 12 ड या अर्जाचे वितरण केले जाणार आहे.निवडणुकीची घोषणा होताच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ते अर्ज संबंधित मतदारांपर्यंत पोहोचविणार आहेत, असे कदम यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination