प्रसाद शिंदे, प्रतिनिधी
Ahilyanagar News: अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात 18 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक 'कार्डियाक कॅथलॅब'चे उद्घाटन माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी दोन वर्षांच्या काळात 2 टक्के विकास कामेही करू शकला नाही, असा टोला त्यांनी लगावला.
पराभवानंतरही विकासकामांचा धडाका
माजी खासदार सुजय विखे म्हणाले, “माझा पराभव झाला असला तरी, पराभवानंतरच्या या दोन वर्षांच्या काळात मी अहिल्यानगर शहरात अनेक मोठे विकास प्रकल्प उभे केले. यात निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महापालिकेच्या दर्जाचे अद्ययावत 'एमआरआय सेंटर' सुरू केले. त्याचबरोबर, दोन वर्षांत 'आयुष' इमारतीची उभारणी, जिल्हा रुग्णालयात अद्ययावत 'आयसीयू' (ICU) ची स्थापना करण्यात आली आणि आता 18 कोटी रुपये खर्चून 'कॅथलॅब' उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.”
( नक्की वाचा : Sikandar Shaikh: महाराष्ट्र 'केसरी' चा बळी? सिकंदर शेखच्या अटकेनंतर वडिलांचा खळबळजनक आरोप )
'पद' महत्त्वाचे नाही, 'सेवा' महत्त्वाची
विखे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक ही कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या 'पदा'मुळे लढवली जात नाही. कॅथलॅबचे हे उद्घाटन मुद्दामून घेतले आहे, कारण अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला हे दाखवायचे आहे की, सुजय विखे हे कुठल्याही 'पदा'मुळे ओळखले जात नाहीत. ते खासदार असोत वा नसोत, विखे पाटील परिवार आणि आमदार संग्राम जगताप हे अहिल्यानगरच्या जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहेत.
लंके यांना नाव न घेता आव्हान
"मी एका वर्षाच्या काळात जेवढी विकासकामे केली, त्या कामांच्या 2 टक्के काम देखील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी (खासदार निलेश लंके) केले नाही," असे म्हणत त्यांनी नाव न घेता खासदार लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
यावेळी सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह पुढील सहा महिन्यांमध्ये 500 एकर जागेत एमआयडीसी (MIDC) उभी करण्याची घोषणा केली. तसेच, खासदार असताना आपण केलेल्या कामांची जाहिरात करू शकलो नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
"पुढील तीन महिन्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये दोन प्रकारचे रुग्ण वाढणार आहेत. एक म्हणजे, ज्यांनी दिवाळीमध्ये फराळ वाटप करूनही ज्यांना तिकीट मिळणार नाही, असे लोक. दुसरे म्हणजे, तिकीट मिळाल्यानंतर निवडून येण्याची कोणतीही आशा नसताना अचानक निवडून आलेले लोक." अशा दोन प्रकारच्या रुग्णांची योग्य सुविधा आणि मोफत उपचार व्हावेत यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेतील सर्व उमेदवारांसाठी ही सुविधा करण्यात आली असल्याचा टोला त्यांनी लगावला.