योगेश पाटील, प्रतिनिधी
Sikandar Shaikh Arrest : 'महाराष्ट्र केसरी' किताब विजेता कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मोहाली पोलिसांनी आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना सिकंदरसह चार जणांना अटक केली आहे. मात्र, सिकंदरला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे', असा थेट आरोप त्याचे कुटुंबीय, वस्ताद आणि कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांकडून होत आहे.
सिकंदरच्या वडिलांनी तर हे 'हिंदकेसरी' स्पर्धेपासून दूर ठेवण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंतरराज्यीय गुन्हेगार पापला गुर्जर गँगशी सिकंदरचा संबंध आहे का? यावरच आता पोलिसांचा तपास केंद्रित झाला आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणात सिकंदर शेख खरंच बळी ठरला आहे का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक
मोहाली पोलिसांच्या सीआयए (CIA) पथकाने आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून, यात राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आणि 'महाराष्ट्र केसरी' विजेता सिकंदर शेख याचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, सिकंदरचा सहभाग आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीत असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींकडून एकूण 5 अवैध बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. यात 4 (.32 बोर) पिस्तूल आणि 1 (.45 बोर) पिस्तूल, तसेच जिवंत काडतुसे (Live Cartridges), रोख रक्कम (Cash) आणि 2 आलिशान कार (Luxury Cars) जप्त करण्यात आल्या आहेत. ही टोळी शस्त्र तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे. या अटकेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
'सिकंदरला फसवण्याचा डाव'
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील असलेल्या सिकंदर शेखच्या अटकेनंतर त्याचे वडील आणि कुटुंबीय चांगलेच संतापले आहेत. सिकंदरचे वडील, पैलवान रशीद शेख यांनी थेट हा प्रकार 'षडयंत्र' असल्याचा आरोप केला आहे. सिकंदरला येणाऱ्या 'हिंदकेसरी' स्पर्धेपासून दूर ठेवण्यासाठी हा सगळा डाव रचला गेला आहे. तसेच, पंजाबमधील कुस्तीपटूंमध्ये सिकंदरच्या नावाची दहशत असल्याने त्याला जाणीवपूर्वक फसवले गेले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आंतरराज्यीय शस्त्रांस्त्रांच्या व्यवहारांसाठी खेळाडूंचा वापर केला जातो का? अशीही आता चर्चा सुरू झाली आहे, आणि सोलापूरचा हा पठ्ठ्या त्याचा बळी ठरला आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. सिकंदर शेख म्हणजे कुस्तीचं जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा आहे. वडिलांनी हमाली करून सिकंदरला तालमीचे धडे दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्या या पैलवानालाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय करत आहेत.
( नक्की वाचा : Sikandar Shaikh Arrest : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला गंभीर गुन्ह्यात अटक, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती )
कुस्ती क्षेत्रातील दिग्गजही भडकले
सिकंदरच्या अटकेमुळे संपूर्ण कुस्ती क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वस्ताद संजय भोकरे यांनी 'सखोल चौकशी केली पाहिजे', अशी मागणी केली आहे. तर अर्जुनवीर काका पवार यांनी 'सिकंदरला यात फसवलं असू शकतं' अशी शंका व्यक्त केली आहे. हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी 'शाहू नगरीची बदनामी होऊ नये', अशी भावना व्यक्त केली आहे.
तर, कुस्ती अभ्यासक मतीन शेख यांच्या मते 'ज्यांची संगत केली त्यांनी फसवले असावे'. सिकंदर कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे शिकला होता. त्याने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मानाचा 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकावला. कमी वयातच आपल्या आक्रमक खेळीने तो देशाच्या कुस्ती पटावर चमकला होता. क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करामध्ये भरती झाला होता, मात्र काही काळाने त्याने ती नोकरी सोडली होती.
( नक्की वाचा : GPS उभे आहात की झोपलेले, कसं आहे तुमचं घर? प्रत्येक क्षण होतोय रेकॉर्ड; डिजिटल पाळत थांबवण्यासाठी करा हे उपाय )
'पापला गुर्जर' गँग कनेक्शन
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अन्य 3 आरोपींमध्ये 'दानवीर' नावाच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. दानवीर हा अवैध शस्त्र पुरवठा करणाऱ्या कुख्यात पापला गुर्जर गँगशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, 'सिकंदर देखील पापला गुर्जर गँगचा सदस्य आहे का?' या दिशेने आता पोलिसांचा तपास सुरू आहे.
पापला गुर्जर (विक्रम गुर्जर) हा हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीतील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला लहानपणापासून कुस्तीची आवड होती. त्याची गुन्हेगारी कारकीर्द 2014 पासून सुरू झाली, जेव्हा त्याने एका हत्याकांडाचा बदला घेतला. अनेकदा अटक आणि फरारी झाल्यावर अखेर 2021 मध्ये त्याला महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून पुन्हा अटक झाली.
2014 च्या हत्याकांडाप्रकरणी त्याला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र केसरी सिकंदर हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत शिकला, तर पापला गुर्जरही बराच काळ कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होता. त्यामुळे सिकंदर आणि पापला गुर्जर यांचा संबंध कोल्हापुरात आला की पंजाबमध्ये, याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत. आंतरराज्यीय टोळीच्या व्यवहारांसाठी सिकंदरचा वापर केला गेला आणि तो या संपूर्ण प्रकरणाचा बळी ठरला, असा आरोप जोर धरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world