उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अजित पवारांबरोबर होते. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. भास्कर जाधव हे एक काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. शिवाय त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही स्विकारली आहे. पण सुनिल तटकरे यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. त्यानंतर आता ते अजित पवारांबरोबर कोकण दौऱ्यात दिसले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होवू लागल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाहाणीसाठी अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा इथं आले होते. इथं संभाजी महाराजांचे भव्य स्मारक होत आहे. याच ठिकाणी संभाजी महाराज राहीले होते. अजित पवार येणार हे माहित असल्याने कसबा इथं भास्कर जाधव हे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या बरोबर उद्योग मंत्री उदय सामंत ही होते. त्यांच्यातही हस्यविनोद रंगला होता. ही सर्व दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तसे पाहाता सामंत आणि जाधव यांच्यातूनही विस्तव जात नाही. तरीही ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत अजित पवारांनीही खुलासा केला आहे. ते म्हणाले आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी केली. भास्कर जाधव ही आमच्या सोबत होते. आम्ही कुठला पक्ष म्हणून तिथे गेलो नव्हतो असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. भास्कर जाधव आणि आपल्या या भेटीचा वेगळा अर्थ लावू नका असं ही अजित पवार म्हणाले. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो असं सांगायला ही अजित पवार विसरले नाहीत.
कसबा इथं होणाऱ्या स्मारकाची पाहणी केली. स्मारक अतिशय चांगलं व्हावं यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत.
आमच्या सोबत काही बांधकाम क्षेत्रातील तज्ञ मंडळी होती. त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी मिळून इथं भव्य दिव्य स्मारक कसं उभारता येईल याची चर्चा केली असं ही यावेळी अजित पवार म्हणाले. किती एकरमध्ये स्मारक होण्यापेक्षा ते स्मारक होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. स्मारकासंदर्भात आमच्याकडे देखील अनेक उपाययोजना सुचवल्या गेल्यात आहेत असं ही ते म्हणाले.