मराठवाड्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. अनेक जिल्ह्यात पुर स्थिती निर्माण झाली आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान ही झालं आहे. शेतकरी हवालदील झाला आहे. सरकारच्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. त्यात आता सरकार बांदावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धाराशिव इथं अजित पवार गेले असता, त्यांना शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत विचारणा केली. त्यावर अजित पवार त्या शेतकऱ्यावरच घसरल्याचे चित्र पहायला मिळाले.
धाराशिव इथं अजित पवार हे पाहणी दौऱ्या दरम्यान पूरग्रस्तावरच भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार पुरग्रस्तांना मार्गदर्शन करत होते. त्यांच्या भाषणा वेळी एका तरुण शेतकऱ्याने त्यांना कर्जमाफीबाबत थेट विचारणा केली. कर्जमाफीचा विषय काढता अजित पवारांचा पारा चढला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले. अरे बाळा सकाळी सहा पासून काम करतोय. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का? यालाच मुख्यमंत्री करा रे असं सांगत मुळ प्रश्नाला बगल दिली. कर्ज माफीच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सोडा पण मी किती चांगलं काम करतो हेच सांगण्यात त्यांनी धन्यता मानली.
दादा तेवढ्यावरच थांबले नाहीत. जो काम करतो त्याचीच मारता का? अशा शब्दात अजित पवार त्या तरुणावर घसरले. आम्ही लाडक्या बहीणींना मदत करत आहे. आम्ही शेतकऱ्याची वीज बील माफी केली आहे. असं सांगत सगळं करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणत विषय मारून गेला. सध्या ओला दुष्काळ मराठवाड्यात जाहीर करण्याती मागणी होत आहे. तसे झाल्यास कर्ज माफी द्यावी लागेल हे सरळ आहे. शिवाय निवडणुकीत कर्ज माफीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता. पण त्याला उत्तर देण्या ऐवजी अजित पवारांनी त्यालाच फैलावर घेतले. अजित पवार हे परंडा तालुक्यातील देवगाव येथे रात्री उशिरा पाहणीसाठी आले होते. त्यावेळी हा प्रकार झाला.