पहलगामधील दहशतवादी हल्ले, ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी यामुळे सध्या देशाच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्याचवेळी राज्यातल्या राजकराणातही नवा भुकंप होण्याची चर्चा काही दिवसांपासून होत होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे काका तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरु होती. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये', असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ही चर्चा आणखी वाढली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार आणि शरद पवार हे काका-पुतणे मागील काही दिवसांमध्ये जाहीर कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीगाठीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही टीका केली होती. संजय राऊत यांची टीका, शरद पवारांचं अनौपचारिक गप्पांमधील वक्तव्य यामुळे दोन्ही पवार पुन्हा लवकर एकत्र येणार असे अंदाज बांधले जात होते. या सर्व चर्चांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिकरणाची सध्या तरी चर्चा नाही. विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे चर्चेचा विषय नाही, असं अजित पवारांनी 'NDTV मराठी' शी बोलताना स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता असल्यानं या चर्चा होत आहेत. आगामी काळातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने ते (शरद पवार) या प्रकारचं वक्तव्य करत असतील, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी हे उत्तर देत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा विषय सध्या तरी फेटाळून लावला आहे.
( नक्की वाचा : Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ? )
काय म्हणाले होते शरद पवार?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायचं की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलं होतं. त्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना पवार म्हणाले होते की, 'उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये. राष्ट्रवादीसोबत जायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा आहे. दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी नेते हे एकाच विचाराचे आहेत. मी आता या प्रक्रियेमध्ये नाही. सुप्रिया सुळे अजित पवारांनी बसून चर्चा करावी. नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे.'