रामराजे शिंदे, प्रतिनिधी
राज्याचा नवा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा असेल हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होण्यास काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे, असं स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलंय. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आज रात्री (गुरुवार, 28 नोव्हेंबर) बैठक होणार आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासह आगामी मंत्रिमंडळाबाबत निर्णय होणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी बुधवारी (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली होती. मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे त्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घ्यावा. ते जो निर्णय घेतली तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपाचा मुख्यमंंत्री होण्यास एकनाथ शिंदे आणि आपल्या पक्षाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असं स्पष्ट झालं आहे.
पवार अर्थ आणि शिंदे गृहमंत्री?
आगामी मंत्रिमंडळात अजित पवार अर्थखातं आणि एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद मिळवण्यासाठी आग्रही आहेत ही चर्चा निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे हे आमचे ध्येय होते. मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे. राज्याच्य़ा इतिहासात पहिल्यांदाच इतका स्पष्ट जनादेश प्राप्त झाला असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ? )
एनसीपीच्या युवा नेतृत्वाला संधी कशी दिली जाईल यावर विचार करत आहोत. लोकसभेत आम्हाला सपोर्ट मिळाला नाही. पण कार्यकर्ते नाराज झाले नाही. पण विधानसभेत चांगला रिझल्ट कसा आणायचा यासाठी प्रयत्न केले. आपले काही उमेदवार 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले आहेत.
ईव्हीएममध्ये घोटाळ्याचे आरोप विरोधक करत आहेत पण त्यात तथ्य नाही. लोकसभेत त्यांना चांगल्या जागा मिळाल्या तेंव्हा पण ईव्हीएम होते. निवडणूक आयोगानं पण सांगितले की एवढ्या वर्षात कधीच कोणती तक्रार आली नाही. देशात अनेक राज्यात निवडणूका झाल्या. विरोधकांना अपयश आले म्हणून आरोप करताहेत. त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : महाविकास आघाडीतील मतभेद उघड! शिवसेनेच्या बड्या नेत्यानं काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर )
एनसीपी राष्ट्रीय पार्टी होती, आणखी जास्त काम करावं लागणार. हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर दिल्लीत एनसीपीचे तालकटोरा मैदानात राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबर नंतर घेणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. असली आणि नकली पार्टीचा प्रश्न येत नाही. निवडणूक आयोगानं प्रत्येक पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यामुळे सर्वच पक्ष असली आहेत, असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं.