अजित पवारांना आता पश्चाताप का होतोय? विधानसभेपूर्वी काकांशी करणार पॅचअप?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
A
मुंबई:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सु्प्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही चूक असल्याचं अजित पवार यांनी कबुल केलं होतं. घरात राजकारण आणायला नको होतं. माझं सर्व बहिणींवर प्रेम आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे काका शरद पवार यांच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. अजित पवार पुन्हा काकांकडं परतणार का? ही चर्चा सुुरु झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले अजित पवार?

'माझं माझ्या सर्व बहिणींवर प्रेम आहे. कुणीही राजकारण घरात आणू नये. सुनेत्रा पवार यांना बहिणीविरुद्ध उभा करुन मी चूक केली. ते व्हायला नको होतं. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय समितीनं तो निर्णय घेतला. मला आज ते चुकीचं वाटत आहे,' असं अजित पवारांनी 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 

अजित पवारांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहे. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे राजकीय पॅचअप करण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिलं जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आहेत. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

( नक्की वाचा : 'सुनेत्रा पवारांना बहिणीविरुद्ध उभं केलं ही चूक', अजित पवारांची मोठी कबुली )
 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झाली. त्यांचा फक्त 1 खासदार निवडून आला. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 10 पैकी 8 जागा जिंकल्या. या पराभवानंतर अजित पवारांसोबत आलेले अनेक मोठे नेते आणि आमदार परत जाण्याची शक्यता आहे.  

भाजपा-शिवसेना सोबतच्या महायुतीमध्येही अजित पवारांचा पक्ष एकरुप झालाय, असं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मुखपत्रातून अजित पवारांची साथ सोडावी अशी मागणी करण्यात आली होती. कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केल्यानं राष्ट्रवादीला मोदी सरकारमध्येही जागा मिळालेली नाही. या सर्व कारणांमुळे पवार कुटुंब पुन्हा एक होणार अशी चर्चा सुरु झालीय. 

Advertisement