सागर शिंदे, प्रतिनिधी
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षाच्या महायुतीला दणदणीत बहुमत मिळालं आहे. विधानसभेतील 288 पैकी 235 महायुतीचे आमदार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबर (गुरुवार) होणार आहे. नव्या मुख्यमंंत्र्यांचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्र्यांचं नाव जवळपास निश्चित आहे. पण, मंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चुरस आहे. अनेक नेत्यांनी त्यासाठी लॉबिंगही सुरु केलंय. यंदा आमदार जास्त आणि मंत्रिपदं कमी अशी महायुतीमध्ये परिस्थिती आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढाकार घेतलाय. शाह यांनी मंत्रिपदासाठी अत्यंत कडक निकष तयार केल्याची माहिती आहे. मंत्रीपदासाठी इच्छूक नेत्यांना हे निकष पूर्ण करावे लागतील.
काय आहेत निकष?
- अमित शाह यांनी महायुतीच्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं आहे. शाह यांनी नव्या मंत्र्यांच्या निवडीसाठी काही निकष तयार केले आहेत. त्यानुसार
- संबंधित आमदाराची लोकसभा निवडणुकीवेळची कामगिरी कशी होती?
- लोकसभेला मतदारसंघातून मताधिक्य होतं का?
- लोकसभा निवडणुकीत महायुतीचं काम प्रामाणिकपणे केलं होतं का?
- मंत्रिपदासाठी इच्छुक असलेला आमदार माजी मंत्री असेल तर मागच्या सरकारच्या काळात त्याची कामगिरी कशी होती?
- संबंधित व्यक्ती मंत्रालयात कामासाठी किती वेळ देत होता?
- महायुती म्हणून घटक पक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?
- निधीचा विनियोग कशा प्रकारे केला गेला?
- मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीमुळं महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का?
- याआधी वादग्रस्त वक्तव्यं केली होती का? हे सर्व तपासलं जाणार आहे.