विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे. सुलभा खोडके यांनी सतत पक्ष विरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सुलक्षा खोडके यांनी पक्षाच्या उमेदवारा विरोधात मतदान केले होते. असा त्यांच्यावर आरोप झाला होता. शिवाय त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुलभा खोडके ह्या अमरावती विधानसभा मतदार संघातून 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपच्या डॉ. सुनिल देशमुख यांचा पराभव केला होता. सुनिल देशमुख हे काँग्रसचेच नेते होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवाय 2014 मध्ये भाजपकडून विजय ही मिळवला होता. त्याचा पराभव सुलभा खोडके यांनी केला होता. सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे अजित पवारांचे कट्टर समर्थक समजले जातात. अमरावती विधानसभेची जागा संजय खोडके यांना हवी होती. पण आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने संजय खोडके यांनी पत्नीला काँग्रेसमध्ये पाठवून आमदार केली होती.
सुलभा खोडके या शरीराने जरी काँग्रेस बरोबर असल्या तरी मनाने त्या राष्ट्रवादी बरोबर होत्या. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर त्यांचे पती संजय खोडके यांनी अजित पवारांना साथ दिली. त्यानुसार सुलभा यांनीही अजित पवारांनाच साथ देण्याचे ठरवले. नुकत्याच विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सुलभा खोडके यांनी पक्षादेशाच्या विरोधात जात मतदान केले होते. त्याच वेळी त्यांच्यावर कारवाई होणार असं सांगितलं जात होतं. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. त्याच वेळी काँग्रेसने त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे.
दरम्यान कारवाईनंतर सुलभा खोडके यांनी काँग्रेस नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला आहे.काँग्रेसकडून आपल्याला सतत डावललं गेलं. स्थानिक कार्यक्रमातूनही लांब ठेवलं जात होतं असा आरोप सुलभा खोडके यांनी केला आहे. या मतदार संघातून काँग्रेसचे संभाव्य उमेदवार हे डॉ.सुनील देशमुख हे आहेत. त्यांच्यावरही खोडके यांनी जोरदार टीका केली आहे. खोडके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरही जोरदार हल्लाबोल केलाय. सुलभा खोडके लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.