विधानभवनातच जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकरांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे विधीनभवनात जोरदार गोंधळ निर्माण झाला. हा राडा इतका जोरदार होता की कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे ही फाडले. उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यात आलं. बुधवारी जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्यात वाद झाला होता. शिवाय शाब्दीक चकमक ही झाली होती. आज आव्हाड यांनी धमकीचे फोन आणि मेसेज ही आले होते. त्यानंतर आज थेट कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं.
या हाणामारीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. कुणी मवाली सारखा येतो. आणि हाणामारी करतो. कुणी आई बहीणीवरून शिव्या देतो. ही संसदीय भाषा आहे का? तसं असेल तर त्यालाच संसदीय भाषा करून टाका असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते लोक मलाच मारण्यासाठी आले होते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. जर विधान भवनात आमदाराचं सुरक्षित नसेल तर आमदार कशाला व्हायचं असा प्रश्नही आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
या घटनेचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही निषेध केला आहे. गुंड विधानभवनात आणले गेले. त्यांच्याकडून हाणामारी करण्यात आली. त्यांना पास कुणी दिले त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे असं ते म्हणाले. आमदाराचं या राज्यात सुरक्षित नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे असं ही ते म्हणाले. सत्तेचा ऐवढा माज कुठून आला असंही ठाकरे यावेळी म्हणाले. ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचंही ठाकरे म्हणाले. ज्या लोकांनी हा प्रकार केला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असं ही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान झालेल्या प्रकारा बाबत आपल्याला काहीच माहित नाही असं गोपिचंद पडळकर यांनी सांगितलं. जे कुणी हे केलं आहे त्यांनाच विचारा असं म्हणत त्यांनी या प्रकरणातून आपले हात झटकले आहेत. दरम्यान आव्हाड यांना जी धमकी देण्यात आली त्या मागे बुधवारी झालेला गोपिचंद पडळकर यांच्याबरोबरच्या वादाची किनार होती अशी चर्चा आहे.विधानभवना बाहेर पडताना भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला होता. त्यावेळचा व्हिडीओ ही व्हायरल झाला होता. त्यात पडळकर शिव्या देताना दिसत होते. गाडी पुढे येण्यावरून हा वाद झाला होता. त्यानंतर त्यावर तिखट प्रतिक्रीया ही उमटल्या पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टीकाही करण्यात आली.