
वरळी नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. त्यामध्ये एकूण 15 हजार 600 भाडेकरूंचे पुनर्वसन होणार आहे. त्यापैकी वरळीमध्ये 556 सदनिकांचे वाटप 15 ऑगस्टपर्यंत करणार आहोत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. एकूण सदनिकांपैकी 25 टक्के सदनिकांचे वाटप डिसेंबर 2025 पर्यंत करण्याचे नियोजन केले आहे. रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करतोय असं ही त्यांनी स्पष्ट केलं. या भागातून जाणाऱ्या पूर्वमुक्त मार्गाचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येतंय. पहिल्या टप्प्यात 6144 झोपडीधारकांचे पुनर्वसन होत असून एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केली आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम आम्ही करीत आहोत असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये मोतीलाल नगर गोरेगाव, जीटीपी नगर येथे समुह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे 4900 रहिवाशांना घरे मिळणार आहेत. कामाठीपुरा अभ्युदयनगर इथल्या समुह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहेत. सप्टेंबर 2025 पर्यंत ती पूर्ण होईल. 11 हजार 411 भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे. असं ही ते म्हणाले. आदर्शनगर वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे क्लस्टरचा लाभ 2010 रहिवाशांना होणार आहे. त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे.
गिरणी कामगारांनी मुंबईच्या विकासासाठी मोठा त्याग केला आहे. आम्ही गिरणी कामगारांना मुंबईलगत घरे बांधून देणार आहोत. मुंबई बाहेर गेलेल्या गिरणी कामगारांना आम्ही मुंबईत आणतोय असं ही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. गिरणी कामगारांचे सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही अॅप तयार केले. मुंबईतल्या आजारी, बंद पडलेल्या गिरण्यांमधल्या 1 लाख 74 हजार 172 गिरणी कामगारांची नोंद झाली.यापैकी 28 गिरण्यांच्या जागांवर बांधकाम पूर्ण करून घरांच्या सोडती चार टप्प्यात म्हाडाकडून काढण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा - Ola Uber Strike: संपाने बळी घेतला, आर्थिक गणित कोलमडल्याने उबरचालकाने उचलले टोकाचे पाऊल
आत्तापर्यंत 13 हजार 161 गिरणी कामगारांना घरं दिली आहेत.एमएमआरमध्ये अंदाजे एक लाख इतकी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षी निर्णय घेतला आहे.एकूण सात जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचं ठरवलं आहे. गिरणी कामगारांना परवडणारी घरे योजनेतून घरे उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी हौसिंग स्टॉकही वाढवला जाईल. त्यासाठी नियमात बदलही केले जातील,अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world