Bacchu Kadu : बच्चू कडू महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार; 'हवामहल' खंडणीतून उभारला? नवा खळबळजनक आरोप

Bacchu Kadu News: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Bacchu Kadu News: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी केलेल्या गंभीर आरोपाला आता आमदार रवी राणा यांनी देखील दुजोरा दिला आहे. बच्चू कडू यांनी खंडणीच्या पैशातून 'हवामहल' बांधला आणि गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्याच्या तायडे यांच्या आरोपात सत्यता असून, 'पूर्ण माहिती सरकारकडे आहे,' असा दावा रवी राणा यांनी केला आहे. तसेच, 'उद्या एजन्सीकडून चौकशी झाली, तर या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोणी असेल, तर तो बच्चू कडू आहे. त्यांच्याकडे सर्वाधिक प्रॉपर्टी (Property) आहे,' असा खळबळजनक आरोपही राणा यांनी केला आहे.

काय केले आरोप?

आमदार रवी राणा यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्या आरोपाला दुजोरा देत, बच्चू कडू यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी शासकीय निधीचा वापर प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये केल्याचे राणा म्हणाले. अपंगांच्या नावाखाली त्यांना अपंग कल्याण मंत्रालय मिळाले. मात्र, त्यांनी स्वतः अपंगांच्या संस्था विकत घेतल्या आणि या संस्थांच्या 'ग्रँड रिलीज (Grant Release) करण्यासाठी पैसै घेतले,' असा थेट आरोप रवी राणा यांनी केला आहे. तायडे यांनी केवळ काही माहिती दिली आहे, तर पूर्ण माहिती सरकारकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.

( नक्की वाचा : Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी भरती, अर्ज कसा करायचा? वाचा संपूर्ण माहिती )
 

नेमके काय आहेत तायडे यांचे आरोप?

अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बच्चू कडू यांच्यावर खंडणी (Extortion) आणि जमीन बळकावल्याचे गंभीर आरोप केले होते.

तायडे यांच्या दाव्यानुसार, बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवरील कुरळपूर्णा (Purnakurna) येथे पूर्णा नदीच्या काठी ७२ एकर जागेवर स्वतःचे आलिशान निवासस्थान, फार्महाऊस (Farmhouse) आणि वेगवेगळ्या सुखसुविधांनी युक्त अशी वास्तू, म्हणजेच 'हवामहल' उभारली आहे. हा 'हवामहल' उभारण्यासाठी गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून जबरदस्तीने बळकावण्यात आल्या, असा तायडे यांचा आरोप आहे.

Advertisement

 या 'हवामहल'च्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा अवैध पैसा वापरण्यात आला. गुटखा (Gutkha) माफिया, लँड माफिया (Land Mafia), वाळू (Sand) माफिया आणि अवैध धंद्यांमध्ये भागीदारी असलेल्या लोकांकडून बच्चू कडू यांनी खंडणी गोळा करून हा परिसर विकसित केल्याचे तायडे यांनी पत्रात म्हटले आहे.

पदाचा गैरवापर आणि चौकशीची मागणी

बच्चू कडू राज्यमंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या परिसराच्या विकास कामांवर शासनाचा निधी वापरला, असा आरोपही तायडे यांनी केला आहे.आमदार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, हा 'हवामहल' तातडीने ताब्यात घेऊन सील करावा आणि बच्चू कडू तसेच त्यांच्याशी संबंधित व्यक्ती व संस्थांच्या गुंतवणुकीची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


आमदार प्रवीण तायडे आणि आता आमदार रवी राणा यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे बच्चू कडू यांच्या भोवतीचा चौकशीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. या सर्व आरोपांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते आणि चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article