जाहिरात

Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी भरती, अर्ज कसा करायचा? वाचा संपूर्ण माहिती

Pune News : पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 322 कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे.

Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी भरती, अर्ज कसा करायचा? वाचा संपूर्ण माहिती
पुणे:

Pune News : पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 322 कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने विविध प्रवर्गासाठी ही पदे खुली केली असून, इच्छुकांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. शहराची कायदा आणि सुव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी ही भरती प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत पोर्टलवर सुरू झाली आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

या भरतीमध्ये जाहीर झालेल्या एकूण 322 पदांचे वाटप प्रवर्गांनुसार करण्यात आले आहे. यानुसार, जनरल आणि महिला या दोन्ही प्रवर्गांसाठी प्रत्येकी 97 पदे उपलब्ध आहेत. माजी सैनिकांसाठी सर्वात जास्त म्हणजे 48 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, गृह रक्षक आणि अंशकालीन पदवीधर या प्रत्येकासाठी 16-16 पदे भरली जाणार आहेत. तसेच, पोलीस कॅडेट्ससाठी 10 आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 6 पदे उपलब्ध आहेत.

( नक्की वाचा : Pune MHADA : पुणे म्हाडा लॉटरीचे 'द्वार' आणखी उघडले! 'या' तारखेपर्यंत अर्ज करा; घराचं स्वप्न होईल पूर्ण )
 

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम

पात्र उमेदवार policerecruitment2025.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. अर्जदारांनी हे लक्षात घ्यावे की, संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस युनिट्ससाठी लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने, एका उमेदवाराला केवळ एकाच पोलीस युनिटसाठी अर्ज करता येईल.

पोलीस भरती समितीच्या अध्यक्षा तथा पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांनी उमेदवारांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, "पोलीस भरतीसाठी कोणी पैसे किंवा लाभाची मागणी करत असेल, तर उमेदवारांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. इतर समस्यांसाठी समितीचे अध्यक्ष किंवा पोलीस आयुक्तांशी संपर्क साधावा."

( नक्की वाचा : Rohit Arya : शूटिंग सांगून खोलीत नेलं, आणि...रोहित आर्यानं मुलांसोबत नेमकं काय केलं? आजींनी सर्वच सांगितलं )
 

भरती आणि पात्रतेचे निकष

उमेदवारांची निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यांत होईल. लेखी परीक्षा 100 मार्क्सची असेल आणि शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून 1:10 च्या प्रमाणात त्यांची निवड केली जाईल. पात्रतेसाठी उमेदवारांनी 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच भरती तारखेनुसार त्यांचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे.

उमेदवारांना शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के आणि लेखी परीक्षेत किमान 40 टक्के मार्क्स मिळवावे लागतील. 40 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र ठरतील. दोन्ही चाचण्यांमधील एकत्रित गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर कागदपत्र तपासणी होऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com