उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री असलेल्या अजित पवारांवर बच्चू कडू यांनी जोरदार टिका केली आहे. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या मानधनात नाममात्र वाढ होते. पण त्याच अजित पवारांच्या पगारात गेल्या पंधरा वर्षात किती वाढ झाली आहे, असा प्रश्न माजी आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. शिवाय त्यांनी अजित पवारांचा वाढलेला पगारच सर्वां समोर सांगितला आहे. अजित पवारांचा पगार 2010 मध्ये 55,000 होता. आता अजित पवारांचा हाच पगार अडीच लाख रुपये आहे. 2010 मध्ये 55 हजार पगार असणारे अजित दादा अडीच लाख रुपये पगार घेतात. तर दुसरीकडे सहाशे रुपये मिळणाऱ्या दिव्यांगांना फक्त पंधराशे रुपये वाढवतात, लाज वाटली पाहिजे अशा शब्दात बच्चू कडूंनी टिकेच झोड उठवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अर्थभेद कसा केला जातो या विरोधात मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानुसार 2 जूनला पहिली सभा अजित पवार यांच्या घरा बाहेर घेतली जाणार आहे. तिथे अर्थभेद नावाचं व्याख्यान करून, अर्थभेद कसा केला जातो, बजेटमध्ये आम्हाला कसं मारलं जातं, हे अजित पवारांच्या गावात जाऊन आम्ही सांगणार आहोत, असं कडू म्हणाले. त्यानंतर पंकजाताई मुंडे, बाळासाहेब पाटील, संजय राठोड यांच्या घरासमोर ही असेच आंदोलन केले जाईल. या आंदोलनाचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर जाऊन मुक्काम करणार असल्याचं ही ते म्हणाले.
एमएसपी नुसार भाव देऊ याच वचन निवडणूकीत महायुतीने दिलं होतं. मात्र यावर आता त्यांचे नेते बोलायला तयार नाहीत. पालकमंत्री बावनकुळे म्हणतात आम्ही कर्जमाफी देऊ. ते नाही म्हणत नाहीत. पण तारीख सांगत नाहीत असा टोला ही त्यांनी लगावला. तुमच्या आमच्या डोक्यात राजकीय पक्षांनी धर्म आणि जात नेऊन टाकली आहे. हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे. आमचा बाप आत्महत्या करतोय, याची चीड येत नाही. सोयाबीनचे भाव 7000 वरून साडेतीन हजारावर विकावं लागलं. आठ नऊ हजाराचा कापूस 7000 ला विकावा लागला, तरी देखील संताप नाही राग नाही. ही राग येण्याची प्रक्रिया जी थांबली आहे ती प्रहार रस्त्यावर उतरून दाखवून देईल असं ही ते म्हणाले.
तामिळनाडू सरकारचे बजेट आहे तीन लाख कोटी रुपयांचं. त्यात कृषीमध्ये तरतूद आहे 44 हजार कोटीची. महाराष्ट्राचे बजेट आहे, साडेसात लाख कोटीचं त्यात शेतीवर तरतूद आहे फक्त 9000 कोटीची. यावर सरकारला आता कोण प्रश्न विचारणार आहे. उत्तर प्रदेशचं शेतीचं बजेटही जास्त आहे असं कडू म्हणाले. महाराष्ट्र सरकारने फक्त 9000 कोटी ठेवले आहेत. यावर एकही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही. काही अंधभक्त यावर टाळ्या वाजवणारे लोक आहेत. त्यांच्या टाळक्यात टाकण्याचं काम येत्या काळात प्रहार करणार आहे असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणसांनी सांगितलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. चार महिने झाले अजित पवार म्हणतात पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे यांचे तर आता कामचं राहिले नाही. वेळ आली तर भगतसिंगसारखी लढाई लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही लढाई साधी नाही. आता छातीवर दगड ठेवावा लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार विरोधात संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.