
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात वॉटर स्ट्राईक केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला पाण्यासाठी तरसावं लागणार आहे. पाणी न मिळाल्यामुळे पाकड्यांचे हालहाल होतील. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. त्यानुसार पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखून धरले आहे. त्यामुळे पाकिस्तानात चिनाब नदीची पातळी दुसऱ्या दिवशी 7 फूट घसरली असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानातील 24 शहरांत, 3 कोटी पाकिस्तानी नागरिक, 4 दिवसांनंतर पाण्यासाठी तरसताना दिसतील अशी स्थिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या वॉटर स्ट्राइकचा परिणाम आता दिसत आहे. भारताने जम्मूच्या रामबन स्थित बगलियार धरणात चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. त्यामुळे सोमवारी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये चिनाब नदीची पाणी पातळी घटून 15 फूट राहिली आहे. रविवारपेक्षा ती 7 फूट आणखी घटली आहे. चिनाब आटत चालल्याने 4 दिवसांनंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील 24 महत्त्वाच्या शहरांत 3 कोटींहून जास्त नागरिकांना पाण्यासाठी तरसावे लागण्याची चिन्हे आहेत.
या शिवाय फैसलाबाद, मुज्जफरगड चिनीउट, आणि हाफिजाबादसारख्या अधिक लोकसंख्येच्या पाकिस्तानी शहरांत 80% लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी चिनाब नदीवर अवलंबून आहे. त्यामुळे या शहरातील लोकांचे पीण्याच्या पाण्यासाठी हाल होणार आहेत हे निश्चित आहे. त्यामुळे जर भारताने पाणी सोडलं नाही तर काय होणार याचाच विचार आता इथले नागरिक करत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. त्या करारानुसार सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास नदीच्या पाण्याची पाककडे विभागणी होती. आता या नद्यांचे पाणी भारताने रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. त्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक पर्यटक हे जखमी झाले होते. गेल्या काही वर्षातील काश्मीरमधला हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर भारताने ही कडक भूमीका घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सर्वात आधी सिंधू जल कराराला स्थिगिती दिली. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यात सांगण्यात आले. शिवाय वाघा अटारी बॉर्डरही बंद करण्यात आली. या हल्ल्यानंतर भारताला जग भरातून पाठिंबा मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world