संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. ही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सोळंके हे धनंजय मुंडे यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जातात. शिवाय दोघे ही बीड जिल्ह्याचेच आहेत.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याचर्चे नंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय मनातली खदखद ही व्यक्त केली आहे. पक्षाला ज्या समाजाने बीड जिल्ह्यात भरभरून मदत केली, त्याच समाजाला गेल्या 45 वर्षांपासून कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नाही. हे दुर्दैव आहे. बीड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहीजे असंही ते यावेळी आवर्जून म्हणाले.
नक्की वाचा - Ladki Bhahin Yojana: लाडक्या बहीण योजनेतून आता 26 लाख लाडक्या बहीणी आऊट, दिलं 'हे' कारण
मंत्री पदासाठी माझी जात आडवी येते अशी खंत ही या निमित्ताने आमदार सोळंके यांनी बोलून दाखवली. आमदार धनंजय मुंडेंना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा असं ही ते यावेळी म्हणाले. त्यांना बीडचं पालकमंत्री करावं, किंवा राज्य पातळीवरील मोठ पद द्यावं असे मिश्किल वक्तव्य ही सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. अनेक वेळा पक्ष श्रेष्ठींसोबत याबाबत मी चर्चा देखील केली. मात्र वायफळ गेले, असे सांगत प्रकाश सोळंके यांनी थेट पक्षश्रेष्ठीवरच निशाणा साधला आहे.
प्रकाश सोळंके यांच्या या नाराजीची दखल पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घेतली आहे. आमदार प्रकाश सोळंकी यांच्या नाराजीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मंगळवारी मुंबईत आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. शिवाय त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण जाणून घेणार आहे असं ही अजित पवार म्हणाले आहे. त्यामुळे मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत सोळंके काय बाजू मांडतात, आणि अजित पवार त्यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.