
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण पक्ष बदलताना दिसत आहेत. त्यातही बऱ्याच जणांचा ओढा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे दिसतोय. त्यात आता विदर्भात महायुतीला दोन दिवसात दोन राजकीय धक्के बसणार आहेत. त्यात गडचिरोलीत अजित पवार गटाच्या नेत्या आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री या पक्षाला रामराम करणार आहेत. तर गोंदीयामध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महायुतीला गळती तर महाविकास आघाडीत इनकमिंग सुरू झाल्याची स्थिती आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या गुरुवारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. भाग्यश्री या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहील्या आहेत. या पक्ष प्रवेशा वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख हे पण उपस्थित राहाणार आहेत. आत्राम कुटुंबातील एक सदस्य शरद पवारांकडे आल्याने हा धर्मरावबाब आत्राम यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाग्यश्री या आगामी विधानसभा निवडणूक अहेरी मतदार संघातून लढण्याची शक्यता आहे. ते आपल्या वडिलांच्या विरोधातच रिंगणात उतरलीतल.
तर दुसरीकडे काँग्रेसमध्येही इनकमिंग सुरू आहे. गोंदियामध्ये भाजप नेते गोपालदास अग्रवाल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गोपालदास अग्रवाल हे पहिले काँग्रेसमध्येच होते. त्यांनी आमदारकीही भूषवली आहे. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपने उमेदवारीही दिली होती. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला. यावेळी त्या मतदार संघातून अग्रवाल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये घर वापसी करण्याचा निर्णय गेतला आहे. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती दिली आहे. गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. त्यांची घरवापसी झाल्यास काँग्रेसला गोंदिया विधानसभा मतदार संघात आणखी ताकद मिळणार आहे.
जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे पक्षांतराचे मोहळ उठलेले दिसेल. कोणता नेता कोणत्या पक्षात हा प्रश्न मतदारांनाच पडेल. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत तसा अनूभव राज्यातील जनतेला आला होता. अनेक नेते हे जागा वाटपावर लक्ष ठेवून आहेत. ज्या पक्षाला जागा जाईल त्या पक्षात जाण्याचा त्यांचा प्लॅन आहे. विधानसभेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. शिवाय राज ठाकरेंची मनसेही मैदानात असणार आहे. प्रकाश आंबेडकरांचे तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पक्षांतरे पाहायला मिळतील अशी स्थिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world