विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होवू शकते. त्यामुळे सर्वच आजी माजी आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. त्यातून आरोप- प्रत्यारोप होत आहेत. कोकणातही तशीच स्थिती आहे. कोकणातल्या गुहागर विधानसभा मतदार संघातून यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव विरुद्ध भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यात थेट लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे दोघेही नेते सध्या मतदार संघात सक्रीय झाले आहेत. त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विकृत कोण? यावरून सध्या गुहागरचे वातावरण चांगलेच तापले आहे. जाधव विरुद्ध नातू हे एकमेकांना यावरूनच सध्या भिडल्याचे दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना उबाठा आणि भाजपमध्ये विकृत टिकेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
माजी आमदार डॉ. विनय नातू यांना लोक सज्जन, सुसंस्कृत, सभ्य समजतात. मात्र 16 फेब्रुवारी रोजी गुहागरमध्ये शिवीगाळीची भाषा भाषणांमध्ये वापरली गेली. तेव्हा विनय नातू हे टाळ्या वाजवत होते. फिदीफिदी हसत होते. त्यामुळे विनय नातू हे विकृत आहेत अशी जहरी टिका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. निवडणुकीला तोंड फुटू दे, विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर, ते विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे, असे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर पणे सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआच्या 96-96-96 फॉर्म्यूल्या मागचे सत्य काय? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
भास्कर जाधव यांची ही टिका विनय नातू यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनीही भास्कर जाधव यांना जशाच तसे उत्तर दिले आहे. मला विकृत म्हणत असताना चुकीचे संदर्भ देऊन स्वतःचा विकृतपणा दाखवण्याचं काम काही जण करत आहेत, असा पलटवार नातू यांनी केला आहे. कोणालाही विकृत म्हणण्याआधी आपण सभेत किती विकृत बोलतो. चुकीचं बोलतो. याचा अभ्यास करायला हवा, अशा शब्दात नातू यांनी जाधव यांना सुनावलं आहे. तसेच तुरंबवच्या शारदा देवीच्या मंदिरात शिवराळ भाषा वापरून यांनी धुडगूस घातला. तो विकृतपणा लपविण्यासाठी दुसऱ्याला विकृत म्हणायचं ही प्रवृत्ती आता बंद केली पाहिजे असंही ते म्हणाले. विकृत कोण आहे हे जनतेला शारदा देवीच्या मंदिरातच लक्षात आलेलं आहे असं ही नातू म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE: नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के,नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
गुहागर विधानसभा मतदार संघात सध्या भास्कर जाधव हे आमदार आहेत. त्यांनी हा मतदार संघ चांगला बांधला आहे. 2009 साली त्यांनी पहिल्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यावेळचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर सलग तीन वेळा या मतदार संघातून ते निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्या समोर भाजपच्या डॉ. विनय नातू यांचे आव्हान असणार आहे. जाधव यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस तर एक वेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक जिंकली आहे. आता शिवसेने बरोबरच राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. अशा वेळी जाधव यांच्या समोर जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून भास्कर जाधव यांनी शिवसेना उमेदवारा मताधिक्य मिळवून दिले होते ही त्यांच्यासाठी जमेची बाजू समजली जात आहे.