जाहिरात
5 minutes ago

हरियाणा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. तर राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यात पुण्यात झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपींचे स्केच जारी केले आहे. त्यांना पकडण्यात यश येतं की नाही याकडेही सर्वांचे लक्ष असेल. 

डहाणू समुद्रकिनारी संशयास्पद बोटीमुळे खळबळ

डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या समुद्रकिनारी 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास स्थानिकांनी संशयास्पद बोट पाहिली. रात्री काही ग्रामस्थ समुद्र किनाऱ्यावर बसले असताना, एक बोट येऊन किनारी थांबली. त्या संशयित बोटीतून हिरव्या रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा लाईट लावला होता. ही बोट डहाणू भागात असलेल्या बोटीपेक्षा वेगळी होती. तिथल्या नागरिकांनी जेव्हा आपल्या मोबाईलच्या लाईटने त्या बोटीला सिग्नल दिल्यानंतर ती पुन्हा खोल समुद्रा निघून गेली. याची कल्पना स्थानिक पोलिसांना देण्यात आली. 

वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रात बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

वेंगुर्ल्यातील निवती समुद्रात मच्छीमारांची बोट बुडाली आहे. मच्छीमारी करून परत येत असताना ही बोट पलटी झाली. या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला आहे. या बाबत वेंगुर्ले निवती पोलीस ठाण्यातून माहिती देण्यात आली आहे.  

भिवंडीच्या वालशिंद गावात गोदामाला भीषण आग

मुंबई नाशिक महामार्गा लगत भिवंडी जवळ गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात हायड्रोलिक ऑइल, कापड, प्लास्टिक वस्तू आणि केमिकलचा साठा होता. त्यामुळे आग लागल्यानंतर स्फोट ही होत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.  

नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के,नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

गुजरातच्या सीमावरती भागाला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा आणि मोठा कडवण परिसरात गेल्या तीन तारखेपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर भूगर्भातूनही आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास मोठा कळवण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून याची नोंद गांधीनगर येथील भूकंपमापन केंद्रात झाली आहे.

मविआची येत्या 7, 8, 9 तारखेला मुंबई पुन्हा एकदा जागा वाटपाची चर्चा

विजयादशमीच्या आधी जागांचा तिढा सोडवून जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करण्याचे मविआचे प्रयत्न आहेत. मविआत काही जागांचा तिढा कायम आहे. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील घेणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री कोणाचा याबाबत ही पुढची रणनिती याबैठकीत ठरणार आहे. 

जालन्यात पहाटेच्या सुमारास NIA आणि ATS ची कारवाई

जालना शहरात सकाळी चार वाजल्या पासून NIA आणि ATS च्या पथकाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.जालन्यातील गांधीनगर भागातून एका संशयीताला या पथकाकडून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सकाळी चार वाजल्या पासून NIA आणि ATS च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या मालेगावत ही कारवाई होत असल्याचे समजत आहे. 

हरियाणा विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात

हरियाणा विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगत आहे. गेल्या दहा वर्षापासून हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. सरकार उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले आहेत. तर तिसऱ्या वेळी सत्तेत येण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. दोन कोटी पेक्षा जास्त मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.  

राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाची भायखळ्यात हत्या

भायखळा तालुका अध्यक्ष मुन्ना खुर्मी यांची हत्या करण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष होते. मध्य रात्री त्यांची हत्या करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महेंद्र देवडा यांनी ही माहिती दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Previous Article
रत्नागिरीतील तरुणांसाठी खूशखबर! CM एकनाथ शिंदेंची दोन मोठ्या प्रकल्पांना मान्यता
LIVE UPDATE:  डहाणू समुद्रकिनारी संशयास्पद बोटीमुळे खळबळ
Prithviraj-Chavan-statement-on-seat-sharing-in-Mahavikas-Aghadi
Next Article
मविआच्या 96-96-96 फॉर्म्यूल्या मागचे सत्य काय? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले