महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सध्या सुरू आहे. काही जागांवर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. तर अनेक जागांवर आजही तिढा कायम आहे. त्यावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. एकाच जागेवर काही ठिकाणी तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. तर काही जागांवर काँग्रेस बरोबर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपाची चर्चा पुढे सरकू शकलेली नाही. त्यात आघाडीत प्रत्येक पक्षाने 96-96-96 अशा समान जागा घ्याव्यात असा फॉर्म्यूला समोर आला होता. त्यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट मत मांडत सत्य काय तेच सांगितले आहे. शिवाय मुख्यमंत्री कोणाचा यावरही त्यांनी भाष्य केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश राज्यात मिळाले. शिवाय आघाडीत मोठा भाऊ कोण हे ही लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले. आघाडीत काँग्रेसने सर्वात जास्त जागा जिंकत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मागे सोडले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्त जागा काँग्रेसलाच मिळाव्यात असा आग्रह पक्षाचा आहे. त्यादृष्टीने पक्षाने रणनितीही आखली आहे. कोणत्याही स्थिती काँग्रेस शंभर पेक्षा कमी जागांवर लढणार नाही हे स्पष्ट आहे. त्याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाचीच भूमीका मांडली आहे.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांची गुगली, मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य
सध्याची राजकीय स्थिती बघता काँग्रेसला राज्यात पोषक वातावरण आहे. अंतर्गत सर्वे नुसार काँग्रेसच्या जवळपास 115 जागा निवडून येवू शकतात असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसला 100 पेक्षा जास्त जागा आघाडीत मिळायला हव्यात असेही ते म्हणाले. शिवाय 96-96-96 या फॉर्म्यूल्याची सध्या चर्चा सुरू आहे. सर्व पक्षांनी समान जागा लढाव्यात असं बोललं जात आहे. मात्र हा फॉर्म्यूला कोणी आणला हे माहित नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे समसमान जागा वाटपाच्या चर्चेच हवाच चव्हाण यांनी काढली आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे...
चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की काँग्रेस कोणत्याही स्थितीत 100 पेक्षा जास्त जागा लढवणार आहे. त्या पेक्षा कमी जागा घेण्यास काँग्रेस तयार नाही. दरम्यान मुख्यमंत्रिपदाबाबतही चव्हाण यांनी भूमीका स्पष्ट केली आहे. चव्हाण म्हणाले, ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री अशी आजपर्यंतची परंपरा राहीली आहे असे सांगत त्यांनी एक प्रकारे ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे सुत्र असेल असेच सुचित केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे हे स्पष्ट आहे.
दरम्यान काँग्रेस विदर्भात सर्वाधिक जागा जिंकेल असा दावाही त्यांनी केला आहे. शिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काँग्रेससाठी चांगले वातावरण असल्याचे चव्हाण म्हणाले. मुंबई आणि कोकणात पक्षाला बळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर लाडकी बहीण योजनेला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात नक्की तोड मिळेल असेही ते म्हणाले. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रमाणे लाडक्या बहिणीला दोन हजार रुपयांचे आश्वासन मिळण्याची शक्यता ही त्यांनी वर्तवली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world